Whats new

डॉ. भालचंद्र नेमाडे यांना ‘फर्ग्युसन गौरव’ पुरस्कार

BHALCHANDRA NEMADE

द फर्ग्युसोनियन्स माजी विद्यार्थी संघटनेच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारा ‘फर्ग्युसन गौरव’ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ भालचंद्र नेमाडे यांना जाहीर झाला आहे. अध्यक्ष ऍड. विजय सावंत यांनी ही घोषणा केली.

संघटनेच्या वतीने फर्ग्युसनमधून शिक्षण घेत विविध क्षेत्रात अतुलनीय योगदान देणा-या महनीय व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा फर्ग्युसनचे माजी विद्यार्थी व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ. नेमाडे यांच्या कोसला, बिढार, हूल, झुल, जरीला, हिंदू:जगण्याची समृद्ध अडगळ या कादंब-या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या हिंदू या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कोसला या कादंबरीतील पांडुरंग सांगवीकर व त्याच्याभवतीचा भवताल यातून फर्ग्युसन, पुण्याचे वातावरण याचे दर्शन वाचकाला घडते. भूमिका घेणारा साहित्यिक म्हणून ओळखल्या जाणा-या नेमाडे यांचा या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव होत आहे. याआधी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, विश्वनाथ प्रतापसिंह यांच्यासह मोहन धारिया, राम ताकवले यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

जानेवारी 2016 मध्ये होणा-या या पुरस्कार वितरण सोहळ्यात अर्थशास्त्रज्ञ विजय केळकर, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे, जलतरणपटू रोहन मोरे यांना ‘फर्ग्युसन अभिमान’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करणा-या दोन विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे, असे सावंत व सचिव यशवंत मोहोड यांनी सांगितले.