Whats new

‘वाडा’ कडून रशियन समिती बरखास्त

WADA

उत्तेजक सेवन प्रकरणात आधीच हबकून गेलेल्या रशियाला आणखी एक धक्का बसला. जागतिक उत्तेजक सेवन विरोधी (वाडा) संस्थेने रशियातील उत्तेजक विरोधी (रसाडा) समितीच बरखास्त केली. या सगळ्यामुळे आता ‘वाडा’ आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारण्यास नकार दिल्यास रशियासाठी ऑलिंपिकचे दरवाजे बंद होतील. उत्तेजक सेवनप्रकरणी रशियन धावपटू मोठ्या संख्येवर सापडल्यानंतर ‘वाडा’ने नियुक्त केलेल्या स्वतंत्र समितीच्या चौकशी अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. या समितीने उत्तेजक सेवन प्रकरणातील मार्गदर्शक तत्त्वे न पाळल्याबद्दल ‘रसाडा’ बरखास्त करण्याची शिफारस केली होती.

ऑलिंपिक चळवळ आणि ॲथलेटिक्सत विश्वााला हादरवून सोडणाऱ्या या सर्वात मोठ्या उत्तेजक सेवन प्रकरणात ‘रसाडा’ संस्थेस जबाबदार धरण्यात आले आहे. ‘वाडा’ने चाचणीसाठी पाठविलेले नमुनेच ‘रसाडा’ने नष्ट केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघाने रशियासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे दरवाजे बंद करून टाकले आहेत. मात्र, ऑलिंपिकमध्ये प्रवेश करण्यास त्यांना सवलत दिली होती. अर्थात आता हे सर्व ‘वाडा’च्या भूमिकेवर अवलंबून राहील असे मानले जात आहे. ऑलिंपिकमध्ये प्रवेश हवा असल्यास रशियाने तातडीने निश्चिचत धोरण ठरवावे असे बंधन त्यांच्यावर टाकण्यात आले आहे.