Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

एलकुंचवार यांना 2015चा ‘कालिदास सन्मान’ पुरस्कार जाहीर

alkunchewar

ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना मध्य प्रदेश राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा महाकवी कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. उज्जन येथील कालिदास अकादमीत ‘अखिल भारतीय कालिदास सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला आहे.
अभिजात संगीत, नृत्य, नाटक आणि शिल्पकला या क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. रंगभूमीवरील भरीव कामगिरीसाठी एलकुंचवार आणि ज्येष्ठ रंगकर्मी मोहन महर्षी यांना हा पुरस्कार अनुक्रमे 2014-15 आणि 2013-2014 दिला जात आहे. प्रसिद्ध रंगकर्मी विनोद नागपाल, भानु भारती, हिमानी शिवपुरी आणि पीयूष मिश्रा यांच्या निवड समितीने एलकुंचवार आणि महर्षी यांच्या नावाची एकमताने निवड केली असल्याचे मध्य प्रदेश राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनायाचे जनसंपर्क अधिकारी सुनील मिश्र यांनी सांगितले.
एक प्रयोगशील नाटककार म्हणून एलकुंचवार यांची ओळख आहे. ‘वाडा चिरेबंदी’, ‘सुलतान’, ‘होळी’, ‘यातनाघर’, ‘पार्टी’, ‘आत्मकथा’, ‘मग्न तळ्याकाठी’ या त्यांच्या काही गाजलेल्या नाटय़कृती. ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाने भारतीय रंगभूमीला एक नवे परिमाण दिले आहे. एलकुंचवार यांच्या ‘मौनराग’, ‘त्रिबंध’ या ललित गद्यांचेही रसिकांनी जोरदार स्वागत केले आहे. याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे ते मानकरी आहेत.
मोहन महर्षी यांनी राष्ट्रीय नाटय़ महाविद्यालयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी विद्यालयाचे संस्थापक इब्राहिम अल्काझी यांच्या सोबत काम केले. ‘एवम् इंद्रजित, ‘शुतुरमुर्ग’, ‘सुनो जन्मेजय’, ‘अंधा युग’, ‘आषाढ का एक दिन’, ‘जोसेफ का मुकदमा’, ‘रसोई’, ‘ऑथेल्लो’, ‘विद्योत्तमा’आदी महर्षी यांची काही गाजलेली नाटके आहेत. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आले. २२ नोव्हेंबर रोजी महर्षी यांना कालिदास सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. सुमती मुटाटकर, गिरीश कार्नाड, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, उस्ताद अल्लारखाँ, डॉ. श्रीराम लागू, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पु. ल. देशपांडे, पं. बिरजू महाराज, नाटककार विजय तेंडुलकर, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. विजया मेहता, पं. सत्यदेव दुबे, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना या पुरस्कारने सन्मानित करण्यता आले आहे.

Next >>