Whats new

पंकज अडवाणी बनला १५ व्यांदा विश्वचॅम्पियन

pankaj adwani

भारताचा सर्वात यशस्वी स्नूकरपटू पंकज अडवाणीने आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पध्रेत विजेतेपदाला गवसणी घालून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. चीनच्या झुआ शिनटाँगला नमवून पंकजने कारकीर्दीतील १५ व्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
सनराइज क्रिस्टल बे रिसॉर्ट येथे झालेल्या अंतिम सामन्यात ३० वर्षीय पंकजने झुआला ८-६ अशा फरकाने नमवले. सप्टेंबर महिन्यात आयबीएसएफचे बिलियर्डस जगज्जेतेपद पटकावणाऱ्या बंगळुरूच्या सुवर्णपुत्राने अवघ्या दोन महिन्यांत आणखी एक जागतिक जेतेपद आपल्या खात्यावर जमा केले.
अंतिम फेरीच्या पहिल्या सत्रात पंकजने ५-२ अशी आघाडी घेतली होती. पंकजच्या झंझावातापुढे १८ वर्षीय झुआचा निभाव लागला नाही. यापूर्वी त्याने सप्टेंबरमध्ये आयबीएसएफ बिलियर्डस किताब जिंकला होता. हा त्याचा २00३ नंतर पहिला ‘१५-रेड’ स्नूकर किताब आहे. त्याने १२ वर्षापूर्वी चीनमध्येच हा किताब जिंकला होता. गेल्या वर्षी पंकजने पहिल्यांदा ‘६-रेड’ वर्ल्ड टायटल आपल्या नावांवर केले होते.

Next >>