Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

पाकला हरवून कनिष्ठ आशिया चषकात भारत चॅम्पियन

Indian-Junior-Mens-Hockey-Team

ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगने हॅट्रिकसह नोंदविलेल्या चार गोलच्या जोरावर भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अंतिम लढतीत ६-२ ने धुव्वा उडवला. आणि ज्युनिअर आशिया कप हॉकी स्पर्धेत तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचा मान मिळवला.

प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत अपराजित राहताना जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. हरमनप्रीतने १०, १५, ३० आणि ५३ व्या मिनिटाला गोल नोंदवले, तर अरमान कुरेशीने ४४ व्या, तर मनप्रीतने (ज्युनिअर) ५० व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. पाकिस्तानतर्फे याकूब मोहम्मदने २८ व्या, तर दिलबर मोहम्मदने ६८ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. भारतीय संघाने मध्यंतरापर्यंत ३-१ अशी आघाडी घेतली होती. भारतीय संघाला पाकिस्तानकडून आव्हान मिळण्याची आशा होती. भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत लढत एकतर्फी केली. भारताने या स्पर्धेत साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकल्यानंतर उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीत सहज विजयाची नोंद केली. भारताने उपांत्य फेरीत जपानचा ६-१ ने पराभव केला, तर अंतिम फेरीत पाकवर ६-२ ने सहज विजय मिळविला.

या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीतने १० व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित भारताला खाते उघडून दिले. हरमनप्रीतने १५ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरदुसरा गोल केला. पाकिस्तानने पुनरागमनाचा प्रयत्न केला. २८ व्या मिनिटाला याकूबने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत पाकचे खाते उघडले. हरमनप्रीतने ३० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित हॅट्रिक केली. मध्यंतरापर्यंत भारताने ३-१ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये अरमान कुरेशीने मैदानी गोल नोंदवित भारताला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. मनप्रीत (ज्युनिअर) याने ५० व्या मिनिटाला भारतातर्फे पाचवा गोल नोंदवला, तर हरमनप्रीतने ५३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर वैयक्तिक चौथा तर भारताचा सहावा गोल केला. पाकिस्तानतर्फे ६८ व्या मिनिटाला दिलबर मोहम्मदने केलेला गोल पराभवातील अंतर कमी करणारा ठरला.

Next >>