Whats new

2015 वा वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष- डब्ल्यूएमओ

al nino

पृथ्वीवरील आतापर्यंतच्या इतिहासात 2015 या वर्षाची नोंद सर्वाधिक उष्ण वर्ष अशी होणार आहे, तर अल्निनोच्या प्रभावामुळे 2016 या वर्षीही काहीशी अशीच परिस्थिती जाणवेल, असे जागतिक हवामान संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) अहवालात म्हटले आहे. तापमानवाढीसंदर्भात कोणतेही पाऊल न उचलल्यास सध्याच्या तापमानात 6 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक वाढ होऊ शकते, असेही या अहवालात म्हटले आहे. उद्योगक्रांतीच्या कालखंडानंतर जागतिक तापमानामध्ये दोन अंशांनी वाढ झाली. हे तापमान 2010 पर्यंत सरासरीपर्यंत आणण्याचे लक्ष्य होते. आताही दोन अंशांनी जागतिक तापमान कमी करणे शक्य आहे; पण त्यासाठी आपणाला वाट पाहावी लागेल आणि हे कठीण होत जाईल. सध्या हरितगृहातील वायूंचे प्रदूषण तसेच इतर उद्योगांद्वारे होणारे प्रदूषण रोखण्याबाबत जलद आणि कठोर निर्णय घ्यावे लागतील. जर हे बंद झाले नाही तर सध्याचे जागतिक तापमान 5 ते 6 अंशांनी वाढलेय व ते अजून वाढू शकते. 

डब्ल्यूएमओच्या मते, 2015 या वर्षातील भूपृष्ठावरील तापमानवाढ ही उद्योगपूर्व कालखंडानंतरचा महत्त्वाचा टप्पा आहे. तापमानातील हे बदल हे अल्निनोच्या प्रभावामुळे आणि मानवनिर्मित तापमानवाढीमुळे झालेले आहेत. अल्निनो जागतिक तापमानवाढीला 16 ते 20 टक्के कारणीभूत आहे; पण त्याबरोबरच ला निना या वातावरणात गारवा ठेवणाऱ्या घटकाच्या कमतेमुळेही ही तापमानवाढ होत आहे. ही पृथ्वीवरील प्राणिमात्रांसाठीच नव्हे, तर सबंध ग्रहासाठीच वाईट बातमी आहे. 

तापमानात 0.73 अंश सेल्सिअसने वाढ - 2011 ते 2015 या पंचवार्षिक काळाची नोंद पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वाधिक उष्णतेचा काळ म्हणून झालेली आहे. या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालखंडातील नोंदीनुसार पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान 1961 ते 1990 च्या सरासरी 14 अंश सेल्सिअसपेक्षा 0.73 अंश सेल्सिअसने जास्त आहे, तर 1880 ते 1899 या औद्योगिक क्रांतीपूर्व काळातील तापमानापेक्षा हे तापमान एक अंश सेल्सिअसने जास्त आहे. यासोबतच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, दक्षिण अमेरिका व रशिया या देशांची तर रेकॉर्डब्रेक तापमानवाढ झालेली आहे. 1998 पासून आतापर्यंत जगातील सर्वाधिक दहा उष्ण वर्षे झाली आहेत. त्यापैकी 2005 नंतर आतापर्यंत आठ वर्षांचा समावेश पहिल्या दहामध्ये आहे. पुढील वर्षीही तापमानवाढीचा धडाका कायमच राहणार आहे. 

Next >>