Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

राज्यातील 43 शहरांत "अमृत' योजना

amrut yojna

‘केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणा-या अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) या महत्त्वाकांक्षी अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या अभियानात राज्यातील 43 शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतेसाठी मलनि:स्सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करण्यासह शहरांतील मोकळ्या जागा, हरित क्षेत्रे, परिवहन व्यवस्था यांमध्ये सुधारणा करून प्रदूषण कमी करणे; तसेच इतर सुविधांची निर्मिती या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
केंद्र सरकारने देशातील 500 शहरांचा समावेश "अमृत‘ अभियानात केला असून, त्यामध्ये राज्यातील 43 शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये 2015-16 ते 2019-20 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून या आर्थिक वर्षासाठी एक हजार तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्या दृष्टीने राज्य उच्चाधिकार समिती, राज्यस्तरीय तांत्रिक समिती, जिल्हास्तर आढावा व संनियंत्रण समिती आणि सचिव (नगरविकास) यांना राज्य अभियान संचालक म्हणून प्राधिकृत करण्यास व त्यानुषंगाने आवश्यक प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यास आज मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे राज्य व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यामधील वित्तीय आकृतिबंध, केंद्र सरकारकडून वितरित होणाऱ्या निधीच्या प्रमाणात राज्य शासनाच्या हिश्शाच्या निधीची उपलब्धता करून देण्यासही मान्यता देण्यात आली.
या अभियानामध्ये बृहन्मुंबई महापालिका; तर ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर या महापालिका आणि अंबरनाथ व बदलापूर नगर परिषदा या आठ शहरांचा समावेश आहे; तसेच पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महापालिका, पुणे जिल्ह्यातील पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन महापालिका, नाशिक जिल्ह्यातील नाशिक व मालेगाव या दोन मनपा, जळगाव जिल्ह्यातील जळगाव मनपा व भुसावळ नगर परिषद, सोलापूरमधील सोलापूर मनपा व बार्शी नगर परिषद, कोल्हापूर जिल्ह्यामधील कोल्हापूर मनपा व इचलकरंजी नगर परिषद, लातूर जिल्ह्यामधील लातूर मनपा व उदगीर नगर परिषद, अमरावती जिल्ह्यातील अमरावती मनपा व अचलपूर नगर परिषद, वर्धा जिल्ह्यातील वर्धा मनपा व हिंगणघाट नगर परिषद; तसेच सातारा नगर परिषद, सांगली-मिरज महापालिका, औरंगाबाद मनपा, नगर मनपा, परभणी मनपा, जालना नगर परिषद, नांदेड-वाघाळा मनपा, बीड नगर परिषद, अकोला मनपा, धुळे मनपा, चंद्रपूर मनपा, रायगड जिल्ह्यातील पनवेल नगर परिषद, गोंदिया नगर परिषद, यवतमाळ नगर परिषद, उस्मानाबाद नगर परिषद, नंदूरबार नगर परिषद आणि नागपूर मनपा अशा एकूण 43 शहरांचा समावेश आहे.