Whats new

2030 पर्यंत ऊर्जेचा वापर 33 ते 35 टक्क्यांनी कमी करणार : भारत

green house gas

भारत 2030 पर्यंत पारंपरिक ऊर्जेचा वापर 35 टक्क्यांनी कमी करेल तसेच कोळसा, कच्चे तेल यांसारख्या कार्बन उत्सर्जन करणा-या जीवाष्म इंधनाचा वीजनिर्मितीसाठी उपयोग 2030 पर्यंत 40 टक्क्यांनी कमी करेल. यातून 3.59 अब्ज टन कार्बन उत्सर्जन कमी होईल, अशी स्वेच्छा उपाययोजना असलेला पर्यावरण आराखडा पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे पॅरिसमध्ये होणा-या जागतिक पर्यावरण परिषदेसाठी जगभरातील 148 देशांनी आपापले पर्यावरण रक्षण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीच्या स्वेच्छा योगदानाचा आरखडा असलेले ‘इन्टेन्डेड नॅशनली डिटर्मिन्ड कॉन्ट्रिब्युशन’ (आयएनडीसी) सादर केले आहेत. भारतानेही ‘आयएनडीसी’ सादर केले आहेत.
भारताचे योगदान समस्या निर्माण करण्यात नाही; परंतु या समस्येवर तोडगा काढण्याच्या प्रक्रियेचा हिस्सा बनण्याची भारताची इच्छा आहे. त्यासाठी पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी पुढील पाच वर्षे नव्हे, तर आगामी पंधरा वर्षांमध्ये करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा भारताने सादर केला आहे .
भारताने ठरविलेल्या स्वेच्छा उपाययोजनांनुसार 2005 च्या तुलनेत 2030 पर्यंत ऊर्जेचा वापर 33 ते 35 टक्क्यांनी कमी केला जाणार आहे. कार्बन उत्सर्जनाला कारणीभूत ठरणा-या तेल, वायू, कोळशासारख्या पारंपरिक इंधनाद्वारे वीजनिर्मिती होते आहे. या इंधनाचा वापर 2030 पर्यंत 40 टक्क्यांनी कमी करण्यावर भर दिला जाईल. ऊर्जेचा वापर कमी करण्यावर 2020 नंतर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार असून, शेवटच्या दहा वर्षांतील ही घट तब्बल 75 टक्क्यांची असेल. यातून भारत 3.59 अब्ज टन कार्बन उत्सर्जन कमी करेल. जागतिक पर्यावरणात भारताचे हे योगदान मोलाचे असेल. यासाठी स्वच्छ ऊर्जेवर भर दिला जाणार आहे. परिणामी, विकसित देशांचे दरडोई कार्बन उत्सर्जनाचे 8.98 मेट्रिक टनाचे प्रमाण आहे त्यात तुलनेत भारताचे दरडोई उत्सर्जन अल्प असेल.
याशिवाय भारतातील वनक्षेत्र वाढविण्यावर भर जाईल. यातून 2.5 ते 3 अब्ज टन कार्बन- डाय- ऑक्साईड शोषून घेणारे "कार्बन सिंक‘ तयार होईल. या पर्यावरण संरक्षणाच्या उपाययोजना करण्यासाठी भक्कम आर्थिक पाठबळ उभे केले जाईल, तसेच विकसित देशांकडून आर्थिक व तांत्रिक मदतही घेतली जाणार आहे
1880 च्या औद्योगिक क्रांतीनंतर आतापर्यंत जागतिक तापमानात 0.85 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. कार्बन उत्सर्जनात सर्वाधिक टक्केवारी अमेरिकेची (29 टक्के) आहे. इतर विकसित देशांचे उत्सर्जन 15 टक्के, चीनचे उत्सर्जन 10 टक्के, तर भारताचे उत्सर्जन केवळ तीन टक्के आहे. 2030 पर्यंत भारत वेगाने विकास करेल. या कालावधीपर्यंत भारताची लोकसंख्या 150 कोटींपर्यंत पोचेल. सर्वांना वीज, घर, दारिद्य्र निर्मूलन, शिक्षण, आरोग्य, बंदर, विमानतळ यांसारख्या गोष्टींचा त्यात विचार करण्यात आला आहे.

असे आहेत स्वेच्छा उपाय
- 2030 पर्यंत ऊर्जेचा वापर 33 ते 35 टक्क्यांनी कमी करणार - पारंपरिक इंधनाचा वापर 40 टक्क्यांनी कमी करण्यावर भर - ऊर्जेचा वापर कमी करण्यावर 2020 नंतर अधिक लक्ष - शेवटच्या दहा वर्षांत ही घट तब्बल 75 टक्क्यांची - यातून 3.59 अब्ज टन कार्बन उत्सर्जन कमी होणार

कार्बन उत्सर्जन
29 टक्के अमेरिका 15 टक्के अन्य विकसित देश 10 टक्के चीन 03 टक्का भारत