Whats new

संगीता, चैताली व सुवर्णा बनल्या राज्याच्या स्वच्छता दूत

sangita-chaitali-suvarna

वाशीम जिल्ह्यातील संगीता आव्हाळे, यवतमाळ जिल्ह्यातील चैताली माकोडे व नाशिक जिल्ह्यातील सुवर्णा लोखंडे या तिघींची राज्याच्या स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत यासंदर्भातील घोषणा केली. या कार्यक्रमात तिघींचाही सत्कार करण्यात आला.
वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील सायखेडा या लहानशा गावातील संगीता नारायण आव्हाडे यांना शौचालय बांधण्यासाठी 13 वर्षे संघर्ष करावा लागला. लग्नानंतर परिस्थिती हलाखीची असल्याने शौचालय उभे राहिले नाही. मात्र आपली होणारी कुचंबणा आपल्या मुलीला भोगावी लागू नये म्हणून त्यांनी आपले मंगळसूत्र विकून शौचालय बांधले. त्यासाठी त्यांनी पती, कुटुंबीय व समाजाचा रोषही ओढवून घेतला. त्यानंतर त्यांना वाशीम जिल्हा व अमरावती विभागाचे स्वच्छता दूत म्हणून जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना मंगळसूत्र दिले. त्यानंतर त्यांचा अनेक ठिकाणी गौरवही करण्यात आला होता. संगीता या वाशीम येथील तनिष्का गटाच्या सदस्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील मोझर या छोट्याशा गावातील चैताली देवेंद्र माकोडे यांनीही परंपरेला फाटा देत चक्क आपल्या लग्नातच शौचालयाची मागणी केली. माहेरी शौचालय आहे, पण लग्न ठरलेल्या घरी शौचालय नसल्याने त्यांना धक्काच बसला. त्यामुळे मला रुखवतात एक-दोन वस्तू कमी द्या, परंतु शौचालय द्याच, अशी आईवडिलांकडे गळ घातली. त्यामुळे वडिलांनी मुलीला रुखवतात रेडिमेड शौचालय भेट म्हणून दिले. स्वच्छतेविषयीच्या या विचारांमुळेच चैताली यांची राज्याच्या स्वच्छता दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील सुवर्णा राजेंद्र लोखंडे यांच्या घरचीही परिस्थिती हलाखीचीच आहे. परंतु स्वच्छतेविषयी त्यांचा दृष्टिकोन तितकाच स्पष्ट आणि ठाम होता. आपल्या वाट्याला आलेली कुचंबणा आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये, उघड्यावर शौचास जाण्याची वेळ तिच्यावर येऊ नये, म्हणून कर्ज काढून शौचालय उभारण्याचे धारिष्ठ्य त्यांनी दाखवले. बचत गटाकडून कर्ज घेऊन त्यांनी शौचालय उभारले.