Whats new

शशांक मनोहर यांची BCCI च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

 SASHANKA MANOHAR

नागपूर येथील ज्येष्ठ वकील शशांक मनोहर यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) 36 व्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मनोहर यांच्या निवडीमुळे श्रीमंत क्रीडा संघटना असलेल्या बीसीसीआयमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली आहे. नामांकन अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर मनोहर यांचा एकमेव अर्ज होता. त्याच वेळी त्यांची निवड निश्चित झाली. झालेल्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब झाले. जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक घेणे आवश्यक होते. मनोहर यांच्या नावाचा प्रस्ताव दालमिया यांचे चिरंजीव अभिषेक यांनी ठेवला, हे विशेष. अभिषेक यांनी दालमिया यांचा कौटुंबिक क्लब एनसीसीचे प्रतिनिधित्व केले.
या वेळी अध्यक्षपदासाठी प्रस्ताव ठेवण्याचा अधिकार पूर्व विभागाला होता. तेथील केवळ एका सूचकाची गरज असताना सर्व सहा संलग्न संघटनांनी सर्वसंमतीने मनोहर यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. त्यामुळे बीसीसीआयच्या राजकारणात श्रीनिवासन यांची पकड सैल झाल्याची प्रचिती आली. श्रीनिवासन बैठकीमध्ये सहभागी झाले नाहीत. तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व पी.एस. रमन यांनी केले. मनोहर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ २०१७ मध्ये संपणार आहे.