Whats new

भारत-जर्मनी दरम्यान अठरा करार - स्वच्छ ऊर्जेसाठी एक अब्ज युरो

 India-Germony

संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि जर्मनी यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले. त्याअंतर्गत ‘ स्वच्छ ऊर्जे ’ साठी जर्मनी भारताला सौर ऊर्जा निधीच्या माध्यमातून एक अब्ज युरोची मदत देणार आहे. तसेच, भारतातील जर्मन कंपन्यांना त्वरित मंजुरी देण्याचा निर्णयही झाला. भारतभेटीवर आलेल्या जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत हे निर्णय झाले. यासह दोन्ही देशांनी अन्य 18 क्षेत्रांतील सहकार्य करारांवर स्वाक्ष-या केल्या.
संरक्षण व संरक्षण उत्पादन, सुरक्षा, सायबर गुन्हे व सायबर सुरक्षा, शिक्षण व कौशल्यविकास आणि संशोधन, स्वच्छ ऊर्जा आणि वातावरण बदल, रेल्वे, व्यवस्थापन तंत्र कौशल्य विकास, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांतील सहकार्याच्या कक्षा अधिक व्यापक व विस्तारित करणा-या अठरा करारांवर भारत- जर्मनीदरम्यानच्या सरकारी पातळीवरील परस्पर सहकार्य व सल्लामसलतविषयक यंत्रणेच्या तिस-या बैठकीच्या निमित्ताने स्वाक्ष-या करण्यात आल्या. जर्मन भाषेचा भारतीय शाळांमध्ये पुन्हा समावेश करणे, तसेच भारतीय भाषाही जर्मनीत शिकविण्याच्या संबंधीही करार करण्यात आला.
भारत-जर्मनी दरम्यानचे असे आहेत अठरा करार
- भारतात एक परकीय भाषा म्हणून जर्मनला आणि जर्मनीत आधुनिक भारतीय भाषांना चालना देणे
- विकास सहकार्यासंबंधीच्या वाटाघाटींच्या संक्षिप्त नोंदी ठेवणे
- भारत-जर्मनी दरम्यान सौर ऊर्जा भागीदारी
- कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण तसेच प्रशिक्षण सहकार्य
- संरक्षण सहकार्य
- नागरी उड्डाण सुरक्षा
- आपत्ती व्यवस्थापन
- कृषी अभ्यासात सहकार्य
- नोबेल विजेत्यांच्या लिंडाऊ परिषदेसाठी नैसर्गिक विज्ञानातील भारतीय युवा शास्त्रज्ञांच्या सहभागाला पाठिंबा देणे
- भारत-जर्मनी विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राच्या कालावधीत वाढ करणे
- उच्च शिक्षणात भारत-जर्मनी भागीदारी
- वनस्पती संरक्षण उत्पादने
- रेल्वेच्या क्षेत्रात विकासासाठी सहकार्य
- भारतात जर्मन कंपन्यांसाठी जलदगती प्रणाली उभारणे
- भारतीय कंपन्यांमधील अधिकारी आणि कनिष्ठ अधिका-यांच्या प्रगत प्रशिक्षणाच्या क्षेत्रात सहकार्य
- केंद्रीय जोखीम मूल्यांकन संस्था तसेच भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणादरम्यान अन्न सुरक्षेत सहकार्य
- भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरण तसेच केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्न सुरक्षा कार्यालयादरम्यान अन्न सुरक्षेत सहकार्य