Whats new

नागपुरातील १५७७ कोटींच्या ‘एम्स’ला केंद्राची मंजुरी

 AIIMS

नागपूर येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) स्थापन करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने औपचारिक मंजुरी दिली आहे. नागपूरमध्ये ‘एम्स’ रुग्णालयाच्या स्थापनेसाठी अंदाजे १५७७ कोटी रुपयांचा खर्च येईल आणि या रुग्णालयामुळे राज्यात माफक आणि विश्वसनीय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातील प्रादेशिक असमतोलही दूर होईल. त्याचप्रमाणे नागपुरात ‘एम्स’ची स्थापना झाल्यामुळे विदर्भातील बहुसंख्य लोकांनाही आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल.
केंद्रीय मंत्रिमंडळाने नागपूरसोबतच आंध्रप्रदेशमधील मंगलागिरी आणि पश्चिम बंगालच्या कल्याणी येथे आणखी दोन एम्स रुग्णालये स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नागपूर, मंगलागिरी आणि कल्याणी येथे स्थापन होणाऱ्या या तिन्ही एम्स रुग्णालयांसाठी अंदाजे ४९४९ कोटी रुपये खर्च येईल. राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेली ‘एम्स’ ही संस्था नागपुरात स्थापन करण्यात यावी, अशी मागणी प्रदीर्घ काळापासून करण्यात येत होती. नागपुरात स्थापन होणाऱ्या ‘एम्स’मध्ये ९६० खाटांचे एक रुग्णालय राहील. या संस्थेत केवळ दर्जेदार वैद्यकीय शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधाच उपलब्ध करून दिल्या जाणार नाही तर त्यात एका नर्सिंग कॉलेजचाही समावेश असेल. याशिवाय अध्यापन विभाग, प्रशासकीय विभाग, आयुष विभाग, प्रेक्षागृह, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रात्रीच्या निवासाची सुविधा, वसतिगृह आणि निवासाची सुविधा असणार आहे.