Whats new

स्वेतलाना अलेक्सिविच यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक

SWETLAN

बेलारूसच्या लेखिका आणि पत्रकार स्वेतलाना अलेक्सिविच यांना यंदाचे साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. दुसरे महायुद्ध, सोव्हिएत महासंघाची पडझड आणि अफगाणिस्तानमधील सोव्हिएत महासंघाचे युद्ध याबाबतचे विदारक वास्तव मांडल्याबद्दल त्यांची या पारितोषिकासाठी निवड केल्याचे नोबेल पारितोषिकाच्या निवड समितीने म्हटले आहे. स्वेतलाना यांचे लिखाण हे ‘गेल्या काळातील धाडस आणि हालअपेष्टांचे प्रतीक’ असल्याचे निवड समितीने म्हटले आहे. स्वेतलाना यांना 6 लाख 91 हजार पौंड इतकी पारितोषिक रक्कम मिळणार आहे.

स्वेतलाना अलेक्सिविच (वय 67) या राजकीय विश्लेषक असून, साहित्याचे नोबेल मिळविणाऱ्या त्या पहिल्या पत्रकार ठरल्या आहेत. त्यांनी आपल्या लिखाणाद्वारे आपल्याच देशाच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांवर अनेकदा कठोरपणे टीका केली आहे. जवळपास अर्ध्या शतकानंतर अकाल्पनिक लिखाण करणाऱ्याला हे पारितोषिक मिळाले असल्याचे निवड समितीने म्हटले आहे. या महान लेखिकेने सोव्हिएत काळातील आणि त्याच्या पतनानंतरच्या काळातील लोकांचा आत्माच आपल्या लिखाणात उतरविला आहे, असेही समितीने म्हटले आहे. रशियातील चेर्नोबिल दुर्घटनेवरील ‘व्हॉइसेस फ्रॉम चेर्नोबिल’ आणि सोव्हिएत महासंघ आणि अफगाणिस्तान यांच्या युद्धाच्या प्राथमिक अहवालावरील ‘झिंकी बाइज्’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची पुस्तके 19 देशांमध्ये प्रकाशित झाली असून, पाच पुस्तकांचे इंग्रजीमध्ये रूपांतर झाले आहे. त्यांनी तीन नाटकेही लिहिली असून, 21 माहितीपटासाठी पटकथा लिहिली आहे.

स्वेतलाना अलेक्सिविच यांचा जन्म 1948 मध्ये युक्रेनमधील इव्हानो फ्रॅंकिस्क या गावात झाला. त्यांचे वडील बेलारूस आणि आई युक्रेनची होती. वडिलांची लष्करी सेवा पूर्ण झाल्यानंतर हे कुटुंब बेलारूसला स्थायिक झाले. येथेच स्वेतलाना यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले. 1985 मध्ये त्यांनी ‘द अनवूमनली फेस ऑफ द वॉर’ हे पहिले पुस्तक लिहिले. दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेल्या अथवा ओढल्या गेलेल्या शेकडो महिलांच्या मुलाखती घेऊन त्यांचे विदारक अनुभव मांडणारे हे पुस्तक चांगलेच गाजले होते. त्याच्या तब्बल वीस लाख प्रती विकल्या गेल्या होत्या. यांचे हे पुस्तक त्यांच्या पुढील वाटचालीची दिशा ठरविणारे ठरले. त्यांना स्वीडनचा प्रतिष्ठेचा "पेन‘ हा पुरस्कारही मिळाला आहे. 1901 ते 2015 या काळात 112 जणांनी साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळविले आहे.