Whats new

चीनचा ब्रम्हपुत्रेवरील जलविद्युत प्रकल्प कार्यरत

china hydroelectric project

चीनने तिबेटमध्ये ब्रम्हपुत्रा नदीवर सर्वात मोठय़ा झानग्मू जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मितीचे काम सुरू केले आहे. तिबेटमधून भारतात येणा-या या नदीचे पाणी मोठय़ा प्रमाणात थांबविण्यात येणार असल्याने भारतासमोरील चिंतेत वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात आलेला प्रकल्प पूर्ण क्षमतेने आता काम करीत असल्याची अधिकृत घोषणा चीनने केली आहे.

तिबेटमधील झानग्मू या मध्यवर्ती ठिकाणी या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पातील सहाही युनिट पूर्ण क्षमतेने कार्य करीत असल्याची माहिती गेझहोबा ग्रुप या कंपनीने दिली. तिबेटमधील सर्वात मोठय़ा असणा-या या प्रकल्पातून वर्षाला 2.5 बिलियन किलोवॅट / तास वीजेची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 1.5 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली. ब्रम्हपुत्रा नदीवर असलेला झानग्मू हा मध्यभागी उभारण्यात आलेला सर्वात मोठा प्रकल्प आहे. याच नदीवर आणखी तीन प्रकल्प उभारण्याचा चीनचा मानस असून हे प्रकल्प पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत. दागू येथे मोठा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याची क्षमता झानग्मू प्रकल्पापेक्षा 510 ते 640 मेगावॅट जास्त असणार आहे. तर दोन लहान प्रकल्प जियाचा आणि जिएक्सू येथे उभारण्यात येणार आहेत.

झानग्मू प्रकल्प हा जगातील सर्वात उंचीवरील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो. तिबेटमधील वीजटंचाई या प्रकल्पामुळे दूर होणार असून या प्रदेशात विकासात्मक योजना राबवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. भारताला या प्रकल्पामुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही अशी ग्वाही चीनने दिल्याचे भारतीय अधिका-यांनी सांगितले. गेल्या वर्षी झालेल्या सहमती करारानुसार भारताच्या जलविद्युत अधिका-यांना या धरणावर जात पाण्याच्या पातळीचा अभ्यास दौरा करण्याची परवानगी मिळालेली आहे. तसेच पुराचा फटका भारतीयांना बसणार नाही असा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या चीन भेटीत उपस्थित करत दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.