Whats new

‘ब्लिट्झ’ मध्ये ग्रिस्चुक वर्ल्ड चॅम्पियन, आनंद 22 वा

aanand

माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदला ब्लिट्झ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 22 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. रशियन ग्रँडमास्टर अलेक्झांडर ग्रिस्चुकने या प्रकाराचे जेतेपद पटकावले. रॅपिड प्रकाराचे जेतेपद मिळविलेल्या मॅग्नस कार्लसनला सहावे स्थान मिळाले.

शेवटच्या दिवशी आनंदचे अनेक सामने ड्रॉ राहिले. त्याच्यासाठी समाधानाची बाब म्हणजे या दिवशी त्याने दहापैकी एकही सामना गमविला नाही. ब्लिट्झ विभागातील पहिल्या दिवशी त्याने 11 पैकी फक्त 6.5 गुणच मिळविले. दुस-या दिवशीही त्याने तितकेच गुण मिळविताना सात डाव अनिर्णीत ठेवले व तीन डाव जिंकले. पाचवेळा विश्व अजिंक्यपद मिळविलेला आनंद आता बिलबाव फायनल मास्टर्स स्पर्धेत भाग घेणार आहे. या महिन्यात होणा-या या स्पर्धेचा तो विद्यमान विजेता आहे.

बर्लिनमधील स्पर्धेआधी आयल ऑफ मान येथे झालेल्या पोकर मास्टर्स स्पर्धेत जेतेपद मिळविलेल्या पी. हरिकृष्णला येथील ब्लिट्झ स्पर्धेत 12 गुण मिळविले तर के. शशीकिरणने 11.5 गुण मिळविले. अन्य भारतीयांत सूर्य शेखर गांगुली व विदित संतोष गुजराथी यांनी प्रत्येकी 11, बी.अधिबनने 10.5, एसपी सेतुरमणने 9.5 गुण मिळविले.

रशियन ग्रँडमास्टर अलेक्झांडर ग्रिस्चुकने शेवटच्या दिवशी धमाकेदार प्रदर्शन करीत जेतेपद पटकावले. त्याने शेवटच्या 9 डावांत 8 गुण मिळविले. त्याने एकूण 21 फे-यांत 15.5 गुण घेत अग्रस्थान मिळविताना फक्त तीन सामने गमविले, पाच अनिर्णीत राखले आणि उर्वरित 13 सामन्यांत विजय मिळविले. दुस-या स्थानासाठी फ्रान्सचा मॅक्झिम व्हाशियर लॅग्रेव्ह व रशियाचा ब्लादिमिर क्रॅमनिक यांच्यात टाय झाले होते. पण सरस टायब्रेक गुणांकाच्या आधारे लॅग्रेव्हला दुसरे व पॅमनिकला तिसरे स्थान मिळाले. क्लासिकल व रॅपिड विभागाचा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या कार्लसनला हा ओघ ब्लिट्झ विभागात कायम राखता आला नाही. त्याने एकूण 14 गुण मिळवित सहावे स्थान पटकावले.