Whats new

कॅनडामध्ये लिबरल पक्षाचा दणदणीत विजय

canada

गेली दहा वर्षे सत्तेमध्ये असणाऱ्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला धक्का देत जस्टीन ट्रुडेऊ यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाने विजय मिळविला आहे. ४३ वर्षीय जस्टीन ट्रुर्डेऊ हे माजी पंतप्रधान पिएरे ट्रुडेऊ यांचे पुत्र आहेत. २००६ पासून कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे स्टीफन हार्पर पंतप्रधानपदी होते. लोकांचा कौल आपल्याला मान्य असून आपण पायउतार होत असल्याचे त्यांनी तात्काळ जाहीर केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जस्टीन ट्रुडेऊ यांचे अभिनंदन केले आहे.

कॅनेडियन संसदेच्या ३३८ एकूण जागांपैकी बहुमतासाठी १७७ जागा मिळविणे आवश्यक असते. यासाठी महत्त्वाच्या तिन्ही पक्षांनी यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत होते. जाहीर झालेल्या निकालांमध्ये लिबरल पक्षाला १८४, कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ९९, न्यू डेमोक्रॅटस्ना ४४, ब्लॉक क्यूबेकना १०, तर ग्रीन पक्षाला केवळ एक जागा मिळाली आहे. आपला कार्यकाळ यशस्वी ठरला होता, हे दाखविण्यासाठी हार्पर यांनी प्रूवन लीडरशिप फॉर स्ट्राँग कॅनडा अशी घोषणा केली होती, तर न्यू डेमोकॅ्रटिकने रेडी फॉर चेंज, लिबरलने रिअल चेंज अशा घोषणा दिल्या होत्या. ७८ दिवसांचा आजवरचा सर्वात मोठा प्रचारकाळ हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य होते. बहुपक्षीय पद्धतीत कॉन्झर्व्हेटिव्ह, लिबरल, न्यू डेमोकॅ्रटस्, ब्लॉक क्यूबेकियन्स व ग्रीन हे महत्त्वाचे पक्ष आहेत. त्यामध्ये स्टीफन हार्पर, लिबरलचे जस्टीन ट्रुडेऊ, न्यू डेमोक्रॅटस्चे थॉमस म्युलकेअर यांच्यात खरी चुरस होती.