Whats new

तरंगणारे शहर दिसल्यामुळे खळबळ

city

इंटरनेटवर गेले काही दिवस चीनच्या एका शहरातील अवकाशात दिसलेल्या दृश्याची प्रचंड चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार त्यांना आकाशात तरंगणारे शहर दिसले होते. मात्र, या रहस्यमय घटनेचा अद्याप उलगडा झाला नसून हा प्रकार परग्रहवासियांच्या अस्तित्वाशी संबंधित असल्याची चर्चा सुरू आहे. चीनच्या गुआंगडाँग असणाऱ्या फोशान शहरातील लोकांनी या घटनेचे चित्रीकरण केले आहे. हे चित्रीकरण निरखून पाहिल्यास ढगांमध्ये एका शहराची प्रतिकृती दिसत आहे. एखाद्या शहरात असतात त्याप्रमाणेच ढगांमध्ये विविध आकाराच्या इमारतींचे आकार दिसल्यामुळे निरनिराळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यापूर्वीही अनेक ठिकाणी अशाप्रकारच्या गूढ गोष्टी दिसल्याचे प्रकार घडले आहेत. त्यानंतर परग्रहवासियांच्या अस्तित्वाविषयी अनेक तर्कवितर्क आणि अंदाजही व्यक्त केले गेले होते. मात्र, त्यामधून फार काही निष्पन्न झाले नव्हते. चीनमधील घटनाही याच प्रकरातील असण्याची शक्यता आहे. याशिवाय, एरवीसुद्धा अशा घटना घडल्यानंतर अमेरिकेकडे संशयाने पाहिले जायचे. हे शहर म्हणजे परग्रहवासियांकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्याचा पूर्वअंदाज व्यक्त करण्यासाठी नासाकडून वापरण्यात येणाऱ्या होलोग्राफिक प्रोजेक्शनचा भाग असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही आकृती म्हणजे फाटा मोर्गना नावाने ओळखले जाणारे एकप्रकारचे मृगजळ आहे. जेव्हा आकाशातील थंड आणि जड हवेचा वरच्या थरातील गरम हवेशी संबंध येतो तेव्हा अशाप्रकारचे आकार तयार होत असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले. शास्त्रज्ञांच्या मते, पाण्याचे साठे असलेल्या परिसरातील आकाशात अशाप्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना निरनिराळे दृश्य दिसू शकते.