Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

संयुक्त राष्ट्रसंघाला 24 ऑक्टोबर 2015 मध्ये 70 वर्षे पूर्ण

UNO

दुस-या महायुद्धानंतर उद्ध्वस्त झालेल्या जगाला सावरण्यासाठी आणि शांततेची पुनर्स्थापना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘संयुक्त राष्ट्रसंघ’ (युनो) या संस्थेला 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त जगभरात उत्साहाचे वातावरण असून हा दिवस दिमाखात साजरा करण्यात येत आहे. जगातील 60 देशांमधील 200 हून अधिक महत्वाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसास्थळे यानिमित्ताने निळय़ा रंगात सजविण्यात आली आहेत. निळा रंग हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या ध्वजाचा रंग आहे.

24 ऑक्टोबर 1945 या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना अमेरिका, चीन, ब्रिटन, फ्रान्स व रशिया आदी राष्ट्रांनी सॅन फ्रान्सिस्को या अमेरिकेतील शहरात त्यासंबंधीच्या करारावर स्वाक्ष-या करून केली होती. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक जागतिक राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींमध्ये या संस्थेची महत्वाची भूमिका राहिली आहे. तेव्हापासून आजपर्यंत जगात घडलेल्या प्रत्येक भौगोलिक आणि राजकीय बदलांची ही संस्था साक्षीदार आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती व रचना: 1939 मध्ये दुस-या महायुद्धाची सुरवात झाली. तेव्हापासूनच या संस्थेच्या स्थापनेचे वेध लागले होते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष प्रँकलीन रूझवेल्ट यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे घोषणापत्र 1939 मध्ये तयार केले होते. त्यात ब्रिटन आणि रशियाचाही सहभाग होता. पण फ्रान्सला दूर ठेवण्यात आले होते. नंतर फ्रान्सचाही समावेश करण्यात आला.

चार प्रमुख घटक: सर्वसाधारण सभा, सुरक्षा परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि विशेष प्राधिकरणे हे या संस्थेचे चार प्रमुख घटक आहेत. यापैकी सुरक्षा परिषदेला सर्वाधिक महत्व असून त्याखालोखाल सर्वसाधारण सभा मानली जाते. कोणताही देश या संस्थेचे सदस्यत्व मागू शकतो. मात्र सदस्यत्व पत्करल्यानंतर त्याला संस्थेचे प्रस्ताव आणि नियम मानावे लागतात. सध्या नव्याने निर्माण झालेला दक्षिण सुदान हा देश धरून 193 देशांनी या संस्थेचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाची उद्दिष्टय़े:
जागतिक शांतता: हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्टय़ आहे. संस्थेच्या सदस्य देशांमध्ये युद्धे होऊ नयेत, आणि झालीच तर लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी ही संस्था प्रयत्नशील असते. युद्धमान देशांमध्ये शांती सेना पाठविण्याचे अधिकारही तिला आहेत. मात्र शांतीसेना पाठविण्याचा प्रस्ताव सुरक्षा परिषदेकडून स्वीकारला जावा लागतो.

मानवअधिकारांचे संरक्षण : वंश, लिंग, भाषा किंवा धर्म यांचा विचार न करता सर्वांना मूलभूत अधिकार मिळाले पाहिजेत. तसेच मानवअधिकारांबद्दल समाजाचा आदर वाढला पाहिजे, असे दुसरे महत्वाचे उद्दिष्ट आहे. मानवाधिकार हननाची नोंद घेण्यासाठी संस्थेने विविध कक्ष स्थापन केले आहेत. तथापि, या संदर्भात कामगिरी नेत्रदीपक नाही.

जगाची आर्थिक प्रगती : गरिबी दूर व्हावी आणि गरीब देशांची आर्थिक प्रगती हे तिसरे उद्दिष्टय़ आहे. दारिद्रय़ आणि भूक निर्मूलन, जागतिक पातळीवरील प्राथमिक शिक्षण, महिला सबलीकरण, स्त्रीपुरूष समानता, बालमृत्यूचे प्रमाण घटविणे, एड्स एचआयव्ही निर्मूलन, पर्यावरण संरक्षण, आर्थिक प्रगतीत जागतिक भागीदारी यासाठी संस्था कार्यरत आहे.

इतर उद्दिष्टय़े : वसाहतवादाचे निर्मूलन हे या संस्थेचे आणखी एक महत्वाचे उद्दिष्टय़ आहे. संस्था स्थापन झाल्यापासून आतापर्यंत 80 वसाहती स्वतंत्र झाल्या आहेत. त्यांच्या स्वातंत्र्यात या संस्थेने महत्वाची भूमिका निभावली आहे. आजही ही संस्था यासंदर्भात कार्यरत आहे.

एकमुष्ट अधिकार सुरक्षा परिषदेकडे
संयुक्त राष्ट्रसंघाची तत्वे आणि उद्दिष्टय़े कागदावर जरी आदर्श असली तरी प्रत्यक्षात तिच्या कामगिरीवर प्रारंभापासूनच प्रश्नचिन्ह उमटले आहे. याचे कारण सुरक्षा परिषदेकडे असणारे सर्वाधिकार हे आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन या पाच देशांची ही परिषद असून ती संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग असली तरी बरेचसे अधिकार तिच्या हाती एकवटले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेसमोर आलेला कोणत्याही प्रस्ताव सुरक्षा परिषदेतच संमत व्हावा लागतो. या परिषदेतील प्रत्येक सदस्याला ‘नकाराधिकार’ देण्यात आला आहे. साहजिकच या पाचपैकी एका देशाने जरी तो वापरला, तरी संपूर्ण प्रस्ताव बारगळतो. परिणामी, सर्वसाधारण सभा ही सर्वात महत्वाची असली तरी खरे अधिकार सुरक्षा परिषदेकडे आहेत. ही परिषद केवळ पाच देशांची मक्तेदारी असल्याने एक प्रकारे सा-या जगाचे अधिकार या पाच देशांच्या हाती एकवटले आहेत. आता जगाची स्थिती बदलल्याने सुरक्षा परिषदेच्या सदस्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. पण ती मान्य करण्याचे अधिकारही सुरक्षा परिषदेकडेच असल्याने हा विस्तार केव्हा होईल, आणि होईल की नाही, ते सांगता येत नाही. या रचनेमुळे संयुक्त राष्ट्रसंघाचा दबाव आणि प्रभाव केवळ कागदोपत्री आहे, अशी टीका केली जाते.