Whats new

पक्ष्यांपासून संरक्षित ज्वारीचे वाण विकसित

MAHA-NS

पक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात बुजगावणे उभारण्यापासून ते गोफण, फटाके वाजविण्याचे विविध प्रयोग शेतकरी करतात़. त्यानंतरही ज्वारी, बाजरीसारखी पिके पक्ष्यांपासून वाचविण्यास अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. मात्र, आता शेतात दाणे भरत असताना पक्ष्यांना ज्वारी खाता येणार नाही, असे वाण विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.

ज्वारी फुले पंचमी असे या सुधारित वाणाचे नाव असून, सध्या हा वाण लाह्या बनविण्यासाठी विकसित केला आहे़ मात्र, पक्ष्यांपासून होणारे नुकसान टाळता येत असल्यामुळे तो शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे़ होप प्रकल्पाअंतर्गत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्पाने लाह्यांसाठी ‘फुले पंचमी’ हा सुधारित ज्वारी वाण विकसित केला आहे़ अहमदनगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील तीनशे शेतकऱ्यांच्या शेतात त्याचा यशस्वी प्रयोग राबविण्यात आला़ या ज्वारीचे दाणे भोंडात असल्याने पक्ष्यांना ते खाता येत नाहीत.

लाह्यांसाठी पूर्वी देशात विविध प्रकार नव्हते. मालदांडीपासून ५० टक्के लाह्या तयार होत असत़ त्यामुळे लाह्यांची ज्वारी तयार करण्याचा विचार पुढे आला़ ‘फुले पंचमी’ ज्वारीपासून ९७ टक्के लाह्या तयार होतात तर केवळ ३ टक्के हलक्या राहतात़ या ज्वारीला पक्ष्याने चोच मारल्यानंतर त्याच्या नाकाला टोचते़ त्यामुळे पक्षी कणसातील दाणे खात नाहीत़.