Whats new

हॉलंडमधील बुद्धिबळ स्पर्धेत अभिजीत गुप्ता विजेता

ABHIJIT GUPTA

भारतीय ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ताने त्याला मिळालेले अग्रमानांकन सार्थ ठरविताना येथे झालेल्या हूगेव्हीन आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. नवव्या व शेवटच्या फेरीत त्याने आपल्याच देशाच्या निलोत्पल दासचा पराभव केला. शेवटच्या फेरीत गुप्ताला सोपा विजय मिळाला. त्याने फक्त 20 चालीत विजय साकार केला. गुप्ताने 9 पैकी 7 गुण मिळविले आणि जवळचा प्रतिस्पर्धी दीप सेनगुप्ता व हॉलंडच्या बेंजामिन बॉक व जान वेर्ले यांच्यापेक्षा त्याने अर्धा गुण जास्त मिळविला. या तिघांनी प्रत्येकी 6.5 गुण मिळविले. मात्र सेनगुप्ताला टायब्रेकच्या आधारे दुसरे व बॉकला तिसरे स्थान मिळाले.

गुप्ताला या स्पर्धेच्या दुस-या फेरीत आपल्याच देशाच्या अंकित राजपाराकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यानंतर अखेरच्या टप्प्यात त्याने सलग तीन विजय मिळवित जबदस्त मुसंडी मारली. त्याने महत्त्वाच्या सामन्यात जान वेर्लेवर शानदार विजय मिळविला होता. आठव्या फेरीतील हॉलंडच्या एर्विन लामीविरुद्धचा डाव खूप कठीण गेल्याचे त्याने नंतर सांगितले. तो आता येत्या नोव्हेंबरमध्ये फिलिपिन्समधील दोन स्पर्धांत सहभागी होणार आहे.