Whats new

अखेर १५ वर्षांनी गीता मायदेशी परतली

GEETA

चुकून सीमारेषा ओलांडत पाकिस्तानात गेलेली गीता ही मूकबधिर तरूणी तब्बल १५ वर्षांनी भारतात परतली असून 26सप्टेंबर२०१५ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास तिचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले. गीताला पाकिस्तानात दत्तक घेतलेल्या ईधी फाऊंडेशनचे काही सदस्यही गीतासोबत भारतात दाखल झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

दोन्ही सरकारांनी गीताच्या हस्तांतर देवाणघेवाणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गीता आज सकाळी कराचीहून दिल्लीला यायला निघाली. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तिचे विमान उशीराने सुटल्याने ती साडेदहाच्या सुमारास भारतात आली.

गीता १५ वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेली होती. पाकिस्तानी सैनिकांना ती लाहोर स्टेशनवर समझोता एक्स्प्रेसमध्ये एकटीच आढळली होती. त्यानंतर ईधी फाऊंडेशनच्या बिल्किस ईधी यांनी तिला दत्तक घेतले होते व ती तेव्हापासून त्यांच्याचकडे राहत होती. १५ वर्षांनी तिच्या कुटुंबियांचा शोध लागला असून ते बिहार येथे वास्तव्य करतात. पाकिस्तानातील भारताच्या उच्चायुक्तांच्या मार्फत तिला कुटुबियांचा फोटो दाखवण्यात आला असता, तिने आपल्या कुटुंबियांना ओळखले आणि अखेर आज ती भारतात परतली.

सलमान खानच्या बजरंगी भाईजानच्या तुफानी यशानंतर गीताची स्टोरी चांगलीच चर्चेत आली आणि पडद्यावरची कथा वास्तवात उतरेल का अशी उत्सुकता दोन्ही देशांतील करोडो नागरीकांना लागली. अखेर, भारत सरकारने गीताच्या घरवापसीसाठी पुढाकार घेतला आणि तिच्या कुटुंबाचा शोध लागून ती आज भारतात आल्याने चित्रपटाप्रमाणेच या कथेचा शेवटही गोड झाला.