Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

वनडे मालिकेतही दक्षिण आफ्रिकेचाच विजयी डंका

SOUTH AFRICA TEAM

फॅफ डु प्लेसिस (133), एबी डी व्हिलियर्स (119) व क्विन्टॉन डी कॉक (109) या ‘थ्री डी’नी भारतीय गोलंदाजीची अक्षरशः कत्तल केल्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा तब्बल 214 धावांनी फडशा पाडला. आणि या एकतर्फी, दणकेबाज विजयासह वनडे मालिकेतही आपलाच डंका जोरात वाजवला. यापूर्वी टी-20 मालिकेत सरस ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेने आजच्या धमाकेदार विजयासह वनडेत 3-2 असा विजय नोंदवला. अर्थात, वानखेडेवर यामुळे रंगतदार लढतीची अपेक्षा मात्र अगदीच फोल ठरली. डु प्लेसिस, डी व्हिलियर्स व डी कॉक यांच्या शतकांमुळे प्रारंभी दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटाकत 4 बाद 438 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात भारताचा डाव 36 षटकात सर्वबाद 224 धावांवरच गुंडाळला गेला. भारतातर्फे केवळ अजिंक्य रहाणे (87) व शिखर धवन (60) यांनीच प्रतिकार केला. आफ्रिकन संघातर्फे रबाडाने 41 धावात 4 तर स्टीनने 38 धावात 3 बळी घेतले.

विजयासाठी 439 धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा (16) व विराट कोहली (7) उत्तुंग फटकेबाजीच्या नादात स्वस्तातच बाद झाले. रोहित शर्माने ऍबॉटच्या गोलंदाजीवर थर्डमॅनवरील इम्रान ताहीरकडे सोपा झेल दिला तर रबाडाच्या गोलंदाजीवर डी कॉकने विराटचा एकहाती अप्रतिम झेल टिपला. रहाणेला 16 धावांवर एल्गारने जीवदान दिले तर धवनचा सोपा झेल मिलरने सोडला. त्याचा लाभ घेत या जोडीने तिस-या गडय़ासाठी 89 चेंडूत 112 धावांची भागीदारी साकारली. धवन 59 चेंडूत 8 चौकारांसह 60 धावा जमवत रबाडाच्या गोलंदाजीवर आमलाकरवी झेलबाद झाला. सुरेश रैनालाही (12) रबाडानेच त्रिफळाचीत केले. अजिंक्य रहाणेने 58 चेंडूत 9 चौकार व 3 षटकारांसह 87 धावा झोडपल्या. मात्र, तो पाचव्या गडय़ाच्या रुपाने बाद झाल्यानंतर भारतासाठी हा मोठा धक्का ठरला. स्टीनने त्याला डीपमधील बेहार्दिनकरवी झेलबाद केले. अक्षर पटेल व हरभजन देखील स्टीनचे बळी ठरले. पटेलने 5 धावावर मिलरकडे तर हरभजन शून्यावर सातव्या गडय़ाच्या रुपाने मॉरिसकडे झेल देत परतला. भुवनेश्वरही (1) आल्या पावलीच तंबूत परतला. धोनीला आमलाने त्रिफळाचीत केले, त्यावेळी भारताच्या 9 बाद 219 धावा झाल्या होत्या. अखेर मोहित शर्मा 4 धावांवर रबाडाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला आणि दक्षिण आफ्रिकेच्या मालिकाविजयावर शिक्कामोर्तब झाले.

आफ्रिकेच्या डावात 3 शतके - प्रारंभी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्लेसिस, डी व्हिलियर्स व डी कॉक यांच्या शतकामुळे त्यांनी 438 धावांचा डोंगर रचला. या त्रिकुटाने शतके तर साजरी केलीच. शिवाय, भारतीय गोलंदाजांच्या मर्यादाही प्रकर्षाने चव्हाटय़ावर आणल्या. प्रारंभी मात्र, हाशिम आमला आश्वासक प्रारंभानंतरही 13 चेंडूत 23 धावांवर बाद झाला होता. मोहित शर्माचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात त्याने यष्टीमागे धोनीकडे सोपा झेल दिला. पुढे क्विन्टॉन डी कॉक व प्लेसिस यांनी मात्र डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या जोडीने शतकी भागीदारी साकारत धावफलक हलता तर ठेवलाच. शिवाय, दडपणही झुगारुन टाकले. डी कॉकला 58 धावांवर असताना मिश्राच्या गोलंदाजीवर मोहितने जीवदान दिले आणि डी कॉकने या जीवदानाचा पुरेपूर लाभ घेत नंतर चौफेर फटकेबाजी करत धोनीचे मनसुबे उधळून देण्यास सुरुवात केली. अखेर सुरेश रैनाने त्याची शतकी खेळी संपुष्टात आणली. कॉकने विराट कोहलीकडे झेल देत तंबूचा रस्ता धरला. त्याने 87 चेंडूत 17 चौकार व एका षटकारासह 109 धावा झोडपल्या.

कॉक बाद झाला, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने 26.5 षटकात 2 बाद 187 धावा जमवल्या होत्या. नंतर डु प्लेसिसने डि व्हिलियर्सच्या साथीने धावांची आतषबाजी कायम राखली. या जोडीने तिस-या गडय़ासाठी 77 चेंडूत 56 मिनिटातच शतकी भागीदारी साकारली. या जोडीमुळेच दक्षिण आफ्रिकेने 40 षटकातच 2 बाद 294 धावा फलकावर लावल्या होत्या. पुढे प्लेसिस 115 चेंडूत 9 चौकार व 6 षटकारांसह 133 धावांवर दुखापतीमुळे निवृत्त झाला. त्याने वनडेतील हे पाचवे तर भारताविरुद्धचे पहिलेच शतक होते. भुवनेश्वरने डि व्हिलियर्सला धोनीकरवी झेलबाद केले. मात्र, तोवर डिव्हिलियर्सने 61 चेंडूतच 3 चौकार व तब्बल 11 षटकारांसह 119 धावा फटकावल्या. शेवटच्या षटकात हरभजनने बेहार्दिनला 16 धावांवर रैनाकरवी झेलबाद केले. अखेर दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकात 4 बाद 438 धावा जमवल्या. उभय संघात आता 4 कसोटी सामने खेळवले जाणार असून मालिकेतील पहिली कसोटी दि. 5 नोव्हेंबरपासून मोहालीत खेळवली जाणार आहे.