Whats new

सर्वाधिक काळ ब्रिटिश राजसत्तेत राहणारी राणी एलिझाबेथ (द्वितीय)

ELIZABET -2 अर्ध्याहून अधिक जगावर ज्या राजसत्तेचे राज्य होते आणि ज्या राजाच्या साम्राज्यावरील सूर्य कधीच मावळत नसे अशा सत्तेमध्ये ६३ वर्षे महाराणी पदावर राहण्याचा विक्रम राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी केला आहे. वयाच्या २५ व्या वर्षी राजगादीवर आलेल्या एलिझाबेथ या आता ८९ वर्षांच्या असून, ब्रिटिश राजवंशातील सर्वाधिक काळ जगलेल्या व्यक्ती असेही रेकॉर्ड त्यांनी बनविले आहे.

9 सप्टेंबर 2015 ला त्यांना ब्रिटिश राजसत्तेचे प्रमुखपद हातात घेऊन ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. या सहा दशकांच्या कालावधीत त्यांनी ब्रिटिश संसदेत अनेक पंतप्रधानांचा कार्यकाळ, अनेक आशियाई, आफ्रिकन देशांचे स्वातंत्र्यही पाहिले.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांना लहानपणी लिलिबेट अशा नावाने हाक मारली जाई. राणीपदावर असताना त्यांनी विविध देशांना भेटी दिल्या आहेत. आजवर ११६ देशांना २६५ भेटी देण्याचा त्यांचा विक्रम आहे. अमेरिकेच्या गेल्या १३ राष्ट्राध्यक्षांपैकी त्यांनी १२ राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आहे. व्हाइट हाउसलादेखील त्यांनी भेट दिली आहे. विन्स्टन चर्चिल, अँथनी एडन, हेरॉल्ड मॅकमिलन, अ‍ॅलेक डग्लस होम, हेरॉल्ड विल्सन, एडवर्ड हिथ, मार्गारेट थॅचर, जॉन मेजर, टोनी ब्लेअर, गॉर्डन ब्राऊन यांच्यासह आताचे ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या कार्यकाळाच्या त्या साक्षीदार आहेत.