Whats new

ब्रॅड हॅडिन कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

BRAD HADDIN

ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक-फलंदाज ब्रॅड हॅडिनने कसोटी व प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यापूर्वी मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने वनडेमधून सर्वप्रथम निवृत्ती स्वीकारली होती. ऍशेस पराभवानंतर कसोटीमधून निवृत्त होणारा तो कर्णधार मायकल क्लार्क, सलामीवीर ख्रिस रॉजर्स व अष्टपैलू शेन वॅटसन यांच्यानंतर चौथा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.

हॅडिन प्रदीर्घ काळ ऍडम गिलख्रिस्टच्या छायेखालीच राहिला व अगदी 30 व्या वर्षांपर्यंत त्याला कसोटी पदार्पण करता आले नव्हते. उशिरा सुरुवात केल्यानंतरही त्याने 66 सामने खेळले. शिवाय, त्यात 32.98 च्या सरासरीने 3266 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियाने 2014 मध्ये घरच्या मैदानावर ऍशेसवर 5-0 असा एकतर्फी कब्जा केला, त्यावेळी हॅडिनने उल्लेखनीय योगदान दिले होते.

37 वर्षीय हॅडिनने यष्टीमागे 270 बळी घेतले असून केवळ ऍडम गिलख्रिस्ट (416), इयान हिली (395) व ऑस्ट्रेलियाचे विद्यमान निवडकर्ते रॉड मार्श (355) यांनीच त्याच्यापेक्षा अधिक यश प्राप्त केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सुदरलँड यांनी हॅडिनच्या कारकिर्दीचा गौरव केला.