Whats new

विदर्भकन्या इलाक्षी ठरली 'मिसेस इंडिया ग्लोब'

MISSES GLOB INDIA ‘वॉव फाउंडेशन’ तर्फे घेतल्या जाणाऱ्या मिसेस इंडिया ग्लोब स्पर्धेत अकोल्याची डॉ. इलाक्षी मोरे-गुप्ता विजेती ठरली आहे. ती आता ‘मिसेस ग्लोब’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. अकोल्याच्या डॉ. शशिकांत व डॉ. मीनाक्षी मोरे या डॉक्टर दाम्पत्याची कन्या असलेल्या इलाक्षीने नागपूर येथून दंतवैद्यक शास्त्रातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
आई-वडील दोघेही डॉक्टर असल्याने डॉक्टरांच्या कार्यक्रमांमध्ये इलाक्षी नेहमीच पुढे राहायची. व्यासपीठावरील तिचे सादरीकरणही सहज होते. दंतवैद्यकशास्त्र शिकत असतानाही मॉडेलिंग आणि ग्लॅमर क्षेत्रातील तिची आवड जराही कमी झाली नाही. या आवडीतूनच तिने वॉव फाउंडेशनच्या मिसेस इंडिया ब्युटी कॉन्टेस्टसाठी ऑनलाइन अर्ज केला. देशातील एकूण 26 स्पर्धकांचा यात सहभाग होता. 5 सप्टेंबरला ही स्पर्धा झाली. यात इलाक्षी विजेती ठरली. त्यामुळे डिसेंबर 2015 मध्ये चीन येथे होणाऱ्या मिसेस ग्लोब स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
नागपुरात इलाक्षीचा जन्म झाला. अकोल्यात इलाक्षीचे बालपण आणि सुरवातीचे शिक्षण झाले. लहानपणापासूनच शांत व संयमी असलेल्या इलाक्षीला संगीत, नृत्य आणि चित्र काढण्याची आवड आहे. यापूर्वी ‘मिसेस ग्लोब’ चा क्राऊन आदिती गोवित्रीकर हिने भारतासाठी आणला होता. आता तो पुन्हा भारतासाठी आणण्याची संधी मला मिळाली आहे. त्या संधीचे मी सोने करेन.