Whats new

जर्मनीला मिळाला भारतीय वंशाचा महापौर

Ashok Shreedharan

बॉन शहराच्या महापौरपदाची निवडणूक जिंकून अशोक श्रीधरन (वय 49) हे जर्मनीमधील एका मोठ्या शहराच्या महापौरपदी बसणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरले आहेत. श्रीधरन हे जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन या पक्षाचे उमेदवार होते.
महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत श्रीधरन यांनी 50.06 टक्के मत मिळवून स्पष्ट बहुमत मिळविले. ते 21 ऑक्टोबरला पदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांच्या या विजयामुळे सोशल डेमोक्रॅटिक पार्टीची या शहरावरील सलग 21 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. निवडणूकपूर्व कलचाचणीतही श्रीधरन आघाडीवर होते. ही लढत चुरशीची होण्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी श्रीधरन यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर सुरवातीपासूनच मोठी आघाडी घेत विश्लेषकांनाही आश्चर्यचकित केले. त्यांच्या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना फक्त 23.68 आणि 22.14 टक्के मते मिळाली. शहरातील 45 टक्के नागरिकांनी मतदान केले होते.
श्रीधरन यांचे वडील भारतीय, तर आई जर्मन आहे. श्रीधरन यांनी बॉनच्या शेजारील शहराचे खजिनदार आणि उपमहापौर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.