Whats new

देशात पहिल्यांदाच नदीजोड प्रकल्प आंध्रात कृष्णा-गोदावरीचे एकत्रिकरण

krushna-godavari river

हैदराबाद महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाचे स्वप्न आंध्रप्रदेशामध्ये साकार झाले असून, कृष्णा आणि गोदावरी या दोन नदींना एकमेकांशी जोडले गेले. यातून गोदावरी नदीच्या पोलावरम कालव्याच्या माध्यमातू 80 टीएमसी पाणी कृष्णेत सोडण्यात आले. यामुळे भविष्यातील पाण्याचे दुर्भिक्ष आणि मान्सून पावसाचे प्रमाण या दोन्हींचा ताळमेळ घालणे सोपे होणार आहे. भारतात 200 वर्षांपूर्वी नदी जोड प्रकल्पाचा पहिला प्रयत्न झाला. ब्रिटिश इंजीनियर सर आर्थर काटन यांनी त्यावेळी आर्थर धोलाश्वेरमवरून वाहणारी गोदावरीला विजयवाडाच्या कृष्णा नदीसोबत जोडण्याचा प्रयत्न केला. पुढे स्वतंत्र भारतात प्रसिद्ध इंजीनियर के.एल. राव यांनी 1950 मध्ये नदी जोड प्रकल्पावर काम सुरू केले. अटल बिहारी वाजपेई जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर त्यात शिथिलता आली.

काय आहे पुढील नियोजन
आंध्र प्रदेशमधून वाहणाऱ्या गोदावरी-कृष्णा, कृष्णा-पेन्नार, पेन्नार-तुंगभद्रा या चार मोठ्या नद्यांना एकमेकांसोबत जोडले जाणार आहे. या शिवाय देशभरातील 30 नद्यांना जोडण्याचे नियोजन आहे. आंध्र प्रदेशनंतर मध्य प्रदेशातील केन आणि उत्तर प्रदेशातील बेतवा नद्यांना जोडले जाणार आहे.

कुणाला होणार फायदा
कृष्णा, गुंटूर, प्रकाशम, कुर्नूल, कडप्पा, अनंतपूर आणि चित्तूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामुळे जळपास १७ लाख एकर (13 लाख एकर कृष्णा डेल्टामध्ये) जमीनीचे सिंचन होणार आहे. या शिवाय या परिसरातील शेकडो गावांना पिण्याचे पाणी मिळणार आहे.

तीन राज्यांतील वाद
गोदावरी नदीवर होत असलेल्या पोलावरम धरणाचे जास्त पाणी कोण घेणार यावरून तेलंगाना, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांत वाद आहे. दरम्यान, हा कुण्या एका राज्याचा नव्हे तर केंद्राचा प्रकल्प असल्याचे केंद्र शासन सांगत आहे. पण, तीन राज्यांच्या विरोधामुळे हा प्रकल्प अजूनही रखडलेला आहे. हे धरण झाल्याने ईस्ट गोदावरी आणि विशाखापट्टनम जिल्ह्यातही फायदा होणार आहे.