Whats new

शनीच्या चंद्रावर महासागराचे अस्तित्व ; नासाचे संशोधन

SHANI

शनीच्या एनसेलॅडस या चंद्रावर बर्फाच्या शिखराखाली द्रव स्वरूपातील पाण्याचा महासागर आहे, असे नासाच्या कॅसिनी मोहिमेतील संशोधनात दिसून आले आहे. संशोधकांच्या मते हा चंद्र शनीभोवती फिरत असून तो किंचित थरथरल्यासारखा दिसतो व त्याच्या आंतरभागातील शिखरावर बर्फाची टोपी असून त्याखाली पाण्याचा महासागर आहे. तेथे काही बर्फाचे कण सापडतात. तेथे काही कार्बनी रेणूही आहेत, पाण्याच्या सागरामुळे ही स्थिती तेथे आहे. यापूर्वी कॅसिनी यानाने जी माहिती गोळा केली त्यानुसार दक्षिण ध्रुवावर महासागर आहे. कॅसिनीने पाठवलेल्या प्रतिमांनुसार काही नवे पुरावे सापडले आहेत. कॉर्नेल विद्यापीठाच्या कॅसिनीच्या प्रतिमा विश्लेषण पथकाचे सदस्य पीटर थॉमस यांनी सांगितले की, यात अनेक वर्षांचे निरीक्षण तसेच गणने यांचा आधार घेतला आहे, पण आमचे निष्कर्ष खरे निघाले आहेत. कॅसिनीच्या वैज्ञानिकांनी किमान सात वर्षे एनसेलॅडस या चंद्राच्या प्रतिमांचे निरीक्षण केले असून या चंद्राची छायाचित्रे २००४ च्या मध्यावधीत कॅसिनी यानाने काढलेली आहेत. एनसेलॅडस या चंद्रावर विवरे आहेत, हा चंद्र लहान असून शनीभोवती फिरताना तो थरथरत असतो. हा बर्फाळ चंद्र असून तो खूप गोलाकार नाही. काही ठिकाणी या चंद्राचा वेग कमी होतो. शनीभोवती फिरताना तो मागेपुढेही होतो. जर पृष्ठभाग व गाभा हे जोडलेले असतील तर त्यात थरथर फार कमी प्रमाणात असते व त्याचे निरीक्षण अवघड असते, असे कॅसिनी प्रकल्पातील वैज्ञानिक मॅथ्यू टिस्कारेनो यांनी सांगितले. पृष्ठभाग व गाभा यांच्या दरम्यान द्रव स्वरूपातील पाण्याचा मोठा भाग आहे. हा सागर गोठला का नाही हे मात्र कोडे आहे. थॉमस व सहकाऱ्यांच्या मते शनीच्या गुरुत्वामुळे उष्णता निर्माण होत असावी त्यामुळे हा सागर गोठला नसावा. इकारस या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.