Whats new

अर्चना-श्रीजा यांना कांस्य

Archana - Shreeja

भारतीय महिला खेळाडू अर्चना कामत गिरीश आणि श्रीजा अकुला यांनी शानदार कामगिरी करताना क्रोएशिया ज्युनिअर आणि कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत तीन कांस्यपदके जिंकली.
स्पर्धेत एकूण १६ संघांनी विविध स्पर्धांत सहभाग घेतला. एका आठवड्याआधी इंदौर येथे झालेल्या भारतीय ज्युनिअर व कॅडेट ओपनमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या अर्चना व श्रीजा यांनी क्रोएशियातील ज्युनिअर स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. अर्चना आणि श्रीजा यांनी हंगेरीच्या किरा स्जाबोच्या साथीने संघ बनवला आणि सर्बिया, चौथा मानांकित इटली, फिनलँड आणि प्युर्तो रिको या मिश्र संघाला सहज पराभूत केले. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाचा ३-१ असा पराभव केला; परंतु उपांत्य फेरीत त्यांना अव्वल मानांकित जर्मनी संघाकडून २-३ फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत अर्चनाने तिच्या दोन्ही लढती जिंकल्या; परंतु श्रीजा व स्जाबो प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलू शकले नाहीत.
ज्युनिअर दुहेरीत अव्वल मानांकित अर्चना व श्रीजा जोडीने चेक गणराज्यच्या कॅटरिना चेचोवा आणि निकिता पेट्रोवोवा या जोडीला पराभूत करीत शानदार सुरुवात केली; परंतु उपांत्य फेरीत स्थानिक कालरा आणि स्लोव्हानियाच्या तमारा पावचनिक या जोडीने त्यांना ६-११, ११-४, ११-९, ११-९ अशी मात दिली. त्यामुळे भारतीय जोडीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत सुरेख कामगिरी करणारी अर्चना कॅडेट एकेरीच्या उपांत्य फेरीत द्वितीय मानांकित रोमानियाच्या अँड्रिया ड्रॅगोमेनकडून ७-११, ७-११, ३-११ अशी सहज पराभूत झाली.