Whats new

भारताकडून 16 हजार कोटींच्या संरक्षण कराराला मंजुरी

Appache-helicopters

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ-यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने (सीसीएस) 2.5 बिलियन डॉलर्सच्या (सुमारे 16 हजार कोटी रुपये) हेलिकॉप्टर्स खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. भारत बोईंग या अमेरिकन कंपनीकडून 22 अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर्स आणि 15 चिनूक चॉपर्स खरेदी करणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सीसीएसची बैठक पार पडली. दोन्ही देशांमध्ये 2013 पासून हेलिकॉप्टर्सच्या किमतीबाबत वाटाघाटी सुरू होत्या .

या कराराची किंमत सुमारे 2.5 बिलियन डॉलर्स असल्याचा अंदाज संरक्षण क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच अमेरिकेचे संरक्षण सचिव ऍश्टॉन कार्टर हे जून महिन्यात भारत दौ-यावर आल्यावर हा करार पूर्णत्त्वास जाईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या करारानुसार भारत अमेरिकन सरकारकडून हेलिकॉप्टर्स व्यतिरिक्त अन्य शस्त्रास्त्र, रडार आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सुट खरेदी करणार आहे. तसेच हेलफायर क्षेपणास्त्र आणि रॉकेट्चीसुद्धा खरेदी करणार आहे. भारत हा शस्त्रास्त्र खरेदीसाठी सर्वात मोठा ग्राहक असल्याने अमेरिका या करारासाठी पाठपुरावा करत होती. गेल्या दशकभरात अमेरिकन कंपन्यांनी भारतासोबत सुमारे दहा बिलियन डॉलर्सचे संरक्षण करार केले आहेत. यामध्ये पी-81 नौदल टेहळणी विमाने, सी-130जे ‘सुपर हरक्युलस’ आणि सी-17 ग्लोबमास्टर-3 या दळणवळणाशी संबंधित विमानाचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनिमित्त अमेरिकेला रवाना होणार आहेत. हेलिकॉप्टर्स करारासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक बैठका पार पडल्या आहेत. अमेरिकेकडून या दरम्यान 10 वेळा कराराच्या किमतीत वाढ करण्यात आली. भारताने आणखी 11 अपाचे आणि चार चिनूक हेलिकॉप्टर्सची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही प्रकारच्या हेलिकॉप्टर्सनी अफगाणिस्तान आणि इराक युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर युद्धादरम्यान त्यांनी एमआय-28एन नाईट हंटर आणि एमआय-26 या रशियन हेलिकॉप्टर्सच्या तुलनेने चांगली कामगिरी केली होती. 22 अपाचे एएच 64डी लॉन्गबो हेलिकॉप्टर अत्याधुनिक समजले जाते. हे हेलिकॉप्टर सर्व वातावरणात काम करू शकते, तसेच यामध्ये रात्रीच्या वेळी लढाई आणि एका मिनिटामध्ये 128 लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता आहे. अत्याधुनिक सेन्सर्स आणि क्षेपणास्त्र डागण्याची ताकद याच्यात आहे.