Whats new

कोर्ट’ने चढली ऑस्करची पायरी !

COURT

राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटविणाऱ्या ‘कोर्ट’ या चित्रपटाने आता थेट ‘ऑस्कर’चा उंबरठा गाठला आहे. ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी भारतातर्फे या चित्रपटाची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली. ऑस्करच्या ‘बेस्ट फॉरेन फिल्म’ या विभागासाठी ‘कोर्ट’ निवडला गेला आहे. या घटनेमुळे मायमराठीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
कोर्टबाजीवर आधारित असलेल्या
कोर्ट या चित्रपटाच्या शर्यतीत बाहुबली, बजरंगी भाईजान, पिकू आणि एनएच १० आदी भरघोस कमाई करणाऱ्या चित्रपटांचे नावे होती. मात्र ‘कोर्ट’ने बाजी मारली.
मराठीला तिसऱ्यांदा मान
ऑस्कर पुरस्कारासाठी ‘कोर्ट’च्या रूपाने मराठी चित्रपटाची तिसऱ्यांदा अधिकृत निवड झाली आहे़ यापूर्वी श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी यांचीही निवड झाली होती.
या चित्रपटाचे चैतन्य ताम्हाणे या युवा दिग्दर्शकाने लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. विवेक गोम्बर या युवा निर्मात्याने निर्मिती केली असून, यात महत्त्वाची भूमिकाही साकारली आहे. आतापर्यंत कधीही कॅमेऱ्यासमोर न आलेले चळवळीतील कार्यकर्ते वीरा साथीदार यांनी यात प्रमुख भूमिका रंगवली आहे. गीतांजली कुलकर्णी या अभिनेत्रीचीही महत्त्वाची भूमिका या चित्रपटात आहे. शाहीर संभाजी भगत यांनी यासाठी गीते लिहिली असून, त्यांनी चित्रपटाला संगीतही दिले आहे. नावाजलेले कलावंत नसतानाही ऑस्करमधील एन्ट्रीपर्यंत या चित्रपटाने गाठलेली उंची महत्त्वाची आहे. ‘कोर्ट’ या चित्रपटात एका लोककलाकाराचा प्रवास रेखाटला आहे. कार्यकर्त्याचे आयुष्य आणि लोककला यांची सांगड या चित्रपटात घातली आहे. एका कार्यकर्त्यावर त्याच्या ध्यानीमनी नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची वेळ येते. या अनुषंगाने या चित्रपटात भाष्य केले आहे. चित्रपट पाहण्याची एक वेगळी दृष्टी देणारा चित्रपट म्हणूनही ‘कोर्ट’चे नाव कोरले आहे. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी ‘कोर्ट’च्या पूर्वी केवळ एक लघुपट आणि एक माहितीपट केला आहे. त्यांचे हे चित्रपट दिग्दर्शनातले पहिले पाऊल आहे. चित्रपटाच्या जडणघडणीविषयी ते म्हणतात, हा चित्रपट करताना आम्ही सगळे नवेच असल्याने आम्ही सगळेकाही सेटवरच शिकत गेलो. कोर्ट या विषयावर अभ्यास करण्यासाठी मी बरेचवेळा कोर्टात जाऊन बसायचो आणि निरीक्षण करायचो. त्या अनुभवातून हा चित्रपट तयार झाला आहे.