Whats new

जपान ग्रां.प्री. मध्ये लेविस हॅमिल्टन विजेता

levis hamilton’s

मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने जपान ग्रां.प्री.शर्यतीचे जेतेपद मिळवित यावर्षीच्या विश्व चॅम्पियनशिपवरील आपली पकड आणखी मजबूत केली. या विजयाने त्याने आयर्टन सेनाच्या 41 फॉर्म्युला वन जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरीही केली.

या मोसमातील अजून पाच शर्यती बाकी असून हॅमिल्टनने त्याचाच संघसहकारी निको रॉसबर्गवर 48 गुणांची आघाडी घेतली आहे. मागील वर्षीही त्याने येथील शर्यत जिंकली होती. पोल पोझिशनवरून सुरुवात केलेल्या रॉसबर्गला मागे टाकून आघाडी घेतल्यानंतर त्याने अखेरपर्यंत ती टिकवून ठेवली. या मोसमातील त्याचे हे आठवे अजिंक्यपद असून आठव्यांदा या मोसमात त्याने व रॉसबर्गने मर्सिडीजसाठ वन-टू फिनिश साधले आहे. रॉसबर्गने 18.9 सेकंद जादा घेत दुसरे स्थान मिळविले तर फेरारीच्या सेबॅस्टियन व्हेटेलने तिसरे स्थान मिळविले. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही या ठिकाणी असाच निकाल लागला होता. हॅमिल्टनचे आता 277 गुण झाले असून रॉसबर्ग 229 व फेरारीचा व्हेटेल 218 गुणांवर आहे. मर्सिडीजने या वर्षात 14 पैकी 11 शर्यती जिंकल्या असून कन्स्ट्रक्टर्स चॅम्पियनशिप जिंकण्याच्या दिशेने त्यांनी आगेकूच केली आहे. त्यांचे 506 गुण असून फेरारीने 337 गुण मिळविले आहेत.

फेरारीच्या किमी रायकोनेनने चौथे, विल्यम्सच्या व्हाल्टेरी बोटासने पाचवे, फोर्स इंडियाच्या निको हुल्केनबर्गने सहावे, लोटसच्या रोमेन ग्रोस्जाँ व पास्टर माल्डोनाडोने सातवे व आठवे, टोरो रॉसोच्या मॅक्स व्हर्स्टापेनने नववे, त्याचाच संघसहकारी कार्लोस सेन्झने दहावे स्थान मिळविले. मॅक्लारेनची मात्र यावेळी निराशा झाली. त्यांच्या फर्नांडो अलोन्सोला 11 वे स्थान मिळाले. त्याच्या इंजिनमध्ये दोष निर्माण झाल्याने त्याने नाराजी व्यक्त केली.