Whats new

ग्रीस आयएमएफच्या 'डिफॉल्टर' यादीत

IMF  

सुमारे १.७ अब्ज डॉलरच्या कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या ग्रीसला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अर्थात आयएमएफ) 'डिफॉल्टर' यादीत टाकले आहे. नाणेनिधीनं 'डिफॉल्टर' घोषित केलेला ग्रीस हा जगातील पहिलाच प्रगत देश आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ग्रीसला कर्जाची परतफेड करण्यासाठी अंतिम मुदत दिली होती. त्या मुदतीत कर्ज फेडण्यासाठी ग्रीसनं अनेक ठिकाणी धावाधाव केली. युरोपियन युनियनने अतिरिक्त मदत करावी अशी मागणी ग्रीसनं केली होती. मात्र, ती मान्य झाली नाही. त्यामुळं ग्रीसचा नाइलाज झाला. कर्जाची परतफेड करणं शक्य नसल्याचं ग्रीसचे अर्थमंत्री यानिस वाराओफकिस यांनी स्पष्ट केले. त्यानंतर नाणेनिधीने ग्रीसला डिफॉल्टर घोषित केले.

आयएमएफचे प्रवक्ते गेरी राइस यांनी याबाबत माहिती दिली. 'ग्रीसच्या डोक्यावर आयएमएफच्या कर्जाचा बोझा प्रचंड वाढला आहे. हे कर्ज चुकते होत नाही तोवर ग्रीसला नाणेनिधीकडून एका पैचीही मदत मिळणार नाही,' असं आयएमएफच्या कार्यकारी मंडळाला कळविण्यात आल्याचं गेरी राइस यांनी सांगितलं.