Whats new

पाचगाव ठरले देशातील पहिले 'वायफाय' गाव

wifi  

सध्या देश उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवी पाऊले टाकत असताना नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील पाचगाव हे गाव 'वायफाय' सुविधा असलेले देशातील पहिले गाव ठरले आहे. सध्या संगणक, इंटरनेटचा जमाना आहे. संपूर्ण देशात 'व्हाट्स अॅप', ‘फेसबुक’ मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. 'वायफाय' सुविधेमुळे सोशल मीडियामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. देशातील अनेक मोठमोठ्या शहरात, विविध शासकीय संस्थांमध्ये 'वायफाय' सुविधा आहे. परंतु, १०० टक्के 'वायफाय' सुविधा देशात अद्याप कोणत्याही शहरात व गावात नाही. केंद्रीय मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी पाचगावला खासदार आदर्श ग्राम मोहिमे अंतर्गत दत्तक घेतले आहे. पाचगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ना. गडकरी धडपडत आहेत. गावकर्‍यांना प्रत्येक सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी गडकरी यांच्यासह संपूर्ण प्रशासन कामाला लागले आहे. १८ कोटी २३ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला. शुभारंभ कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी पाचगाव हे देशातील पहिले १०० टक्के 'वायफाय' असलेले गाव ठरल्याचे सांगितले. गावातील प्रत्येकाकडे 'अँन्ड्राईड' मोबाईल असून, सर्वांनाच 'वायफाय'ची सुविधा मिळणार आहे. गडकरींनी पाचगाव देशात प्रथम ठरल्याचा उल्लेख करताच गावकर्‍यांनी टाळ्या वाजवून एकच जल्लोष केला. दत्तक घेतलेले पाचगाव १०० टक्के 'वायफाय' झाले हा माझ्यासाठी अभिमान असल्याची भावनाही गडकरी यांनी व्यक्त केली. पाचगाव १०० टक्के 'वायफाय' झाल्याने गावातील तरुण जगाशी संपर्क करू शकतील. याशिवाय केंद्र शासनाकडे विकास आराखडा सुपूर्द करणारे पाचगाव देशातील पहिले गाव ठरल्याचेही गडकरी यांनी सांगितले. 'ई-लायब्ररी'मुळेही तरुणांच्या ज्ञानात भर पडणार असून, गावात बसून तरुण जणू जगाशीच संवाद साधणार आहेत.

------------------