Whats new

पोस्टाची पेमेंट बँक सप्टेंबरमध्ये

post bank  

पोस्ट खात्याला पेमेंट बँक सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे येत्या सप्टेंबर महिन्यात परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. ही परवानगी मिळाल्यास तातडीने पेमेंट बँकेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
'देशभरात विखुरलेल्या १,५४,००० टपाल कार्यालयांतून (त्यापैकी १,२५,००० कार्यालये ग्रामीण भागात आहेत) ग्राहकांना बँकिंग सेवा वितरित करण्याचा खात्याचा मानस आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर येईपर्यंत केवळ २३६ कार्यालयांमध्येच कोअर बँकिंगची सुविधा होती. मात्र, वर्षभराच्या काळात ही सुविधा २,५९० कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे,' असेही प्रसाद यांनी नमूद केले.

पेमेंट बँकेच्या माध्यमातून पोस्ट खात्याचा चेहरामोहरा, तसेच कार्यपद्धती बदलण्याचा आमचा प्रयत्न असून, आगामी सहा महिन्यांमध्ये ५०० कोटींच्या उलाढालीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही दूरसंचारमंत्र्यांनी स्पष्ट केले. या बँकेच्या माध्यमातून 'सुकन्या समृद्धी योजना', 'विमा योजना', 'जनधन योजना' आदी सरकारी योजनाही राबविण्यात येणार आहेत. 'सुकन्या समृद्धी योजने'च्या माध्यमातून आतापर्यंत ५२ लाख खाती उघडण्यात आल्याचेही प्रसाद यांनी नमूद केले.