Whats new

अंदमानातील विश्वसाहित्य संमेलनाध्यक्षपदी शेषराव मोरे

Sheshrao_More  

चौथे विश्वसाहित्य संमेलन येत्या 5 आणि 6 सप्टेंबर रोजी अंदमानात होत असून, या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी ही घोषणा केली.

महाराष्ट्र मंडळ, पोर्टब्लेअर आणि ऑफबीट संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अंदमानातील पोर्टब्लेअर येथे हे संमेलन पार पडणार आहे. यापूर्वी ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी अध्यक्षपदासाठी आपला नकार कळविला होता. महानोरांनी नकार कळविल्यानंतर माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, विवेक घळसासी, प्र. ल. गावडे, शं. ना. नवलगुंदकर, विनय हर्डीकर यांची नावे चर्चेत होती. परंतु, अखेरीस प्रा. शेषराव मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मोरे यांनीही तत्काळ होकार देऊन आपले संमतीपत्रही महामंडळाकडे पाठविलेले आहे, असे वैद्य यांनी यावेळी सांगितले. या आधी सेंट होजे, सिंगापूर आणि दुबई येथे विश्वसहित्य संमेलन पार पडले आहे. दुबईला विश्वसंमेलन झाल्यानंतर चार वर्षांनंतर विश्वसाहित्य संमेलनाचा योग जुळून आला आहे. वैद्य म्हणाल्या, मुंबई साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि परिषदेच्या इतर शाखांमध्ये संमेलनाच्या नावनोंदणीस सुरुवात होईल. मोरे यांनी 1999 साली परभणीमध्ये भरलेल्या स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे.

चिकित्सक शेषराव मोरे :

शेषराव मोरे यांचे सावरकरांवरील साहित्य तसेच काश्मीरवरील ग्रंथ विशेष गाजला. त्यांचा जन्म 17 ऑगस्ट 1948 रोजी नांदेड जिह्यातील मुखेड तालुक्यात झाला. औरंगाबादमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. ई. (विद्युत), नंतर एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. शाळेपासूनच वैजनाथ उप्पे यांच्या प्रेरणेतून त्यांनी स्वा. सावरकरांच्या अभ्यासाला सुरुवात केली. महाविद्यालयीन जीवनातच समग्र सावरकरांचे आठ खंड अभ्यासले. प्रखर बुद्धिवादी व समाजक्रांतिकारक सावरकरांचे आपल्याला झालेले दर्शन समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, या तळमळीने त्यांनी त्यांच्यावर अधिक अभ्यास केला. सावरकरांबरोबरच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचादेखील सखोल अभ्यास केला आहे. इस्लामचाही अभ्यास करण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे घालविली.

मोरे यांची ग्रंथसंपदा

‘सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास’, ‘सावरकरांचे समाजकारणः सत्य आणि विपर्यास संक्षिप्त आवृत्तीः सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग’, ‘काश्मीर : एक शापित नंदनवन’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक धोरणः एक अभ्यास’, ‘विचारकलह’, ‘अप्रिय पण (भाग पहिला)’, ‘शासनपुरस्कृत मनुवादीः पांडुरंगशास्त्री आठवले’, ‘मुस्लीम मनाचा शोध’, ‘इस्लामः मेकर ऑफ द मुस्लीम माईंड’, ‘प्रेषितांनंतरचे चार आदर्श खलिफा’, ‘1857 चा जिहाद’, ‘अप्रिय पण (भाग दोन)’, आणि ‘काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला’ अशी मोरे यांची ग्रंथसंपदा आहे.

----------------