Whats new

ग्रीस तिढा सुटला!

GREECE  

कर्जाच्या गर्तेत बुडालेल्या ग्रीसने त्यातून बाहेर पडण्यासाठी अखरे युरोझोनबरोबर संपुट योजना समझोता करार केला असून रात्रंदिवस केलेल्या चर्चेचे हे फलित आहे. युरोपीय समुदायाची या विषयावर आयोजित केलेली बैठक त्यामुळेच रद्द करण्यात आली होती.

पंतप्रधान अ‍ॅलेक्सिस सिप्रास यांनी अतिशय कडक आर्थिक सुधारणा योजना या करारात मान्य केल्या असून सुमारे सतरा तास या वाटाघाटी चालल्या होत्या. आता या वाटाघाटीअंती ग्रीसला ९६ अब्ज डॉलर्स म्हणजे ८६ अब्ज युरो इतके कर्ज तीन वर्षांसाठी मिळणार असून पाच वर्षांत ग्रीसच्या अर्थव्यवस्थेला तिसऱ्यांदा आर्थिक मदतीचा आधार घ्यावा लागला आहे. युरोशिखर बैठकीत हा तोडगा निघाला असल्याचे युरोपीय समुदायाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितले. युरोपीय स्थिरता यंत्रणेतून ग्रीसला निधी दिला जाईल पण त्यासाठी त्यांनी गंभीर आर्थिक सुधारणांना मान्यता दिली आहे. २०१० पासून ग्रीसला तिसऱ्यांदा मदत द्यावी लागली आहे. सिप्रास यांना जानेवारीतील निवडीनंतर सहा महिने अर्थव्यवस्थेला मोठा संघर्ष करावा लागला, त्यात ग्रीसचे युरोझोन सदस्यत्व जाण्याची वेळ आली होती. ग्रीसमधील बँका जवळपास दोन आठवडे बंद होत्या, जादाचा युरोपीय निधी मिळाल्याशिवाय त्यांची गंगाजळी आटल्यासारखीच होती. त्यामुळे एकतर ग्रीसला स्वत:चे चलन छापावे लागले असते म्हणजेच युरोमधून बाहेर पडवे लागले असते. त्यालाच ग्रेक्झिट हा शब्द रूढ झाला होता. आता ग्रेक्झिट टळले आहे असे युरोपीय समुदायाचे अध्यक्ष क्लॉद जकर यांनी सांगितले.

असा सुटला ग्रीसचा तिढा..

* ग्रीसला तीन वर्षांसाठी ९६ अब्ज डॉलर्सचे कर्ज

* बैठकीत ग्रीसला कर्जातून बाहेर काढण्यासाठी मदत मंजूर

* कठोर आर्थिक सुधारणांचे पालन करण्याची अट

* युरो चलनात ग्रीस कायम राहणार

* आशियातील अनेक देशांत शेअर बाजार तेजीत

* करारातील अटी पाळणे ग्रीसला आव्हानात्मक