Whats new

नाशिकमध्ये भक्तीच्या महाकुंभाला प्रारंभ

kumbh  

तब्बल 12 वर्षांनी नाशिकच्या गोदाकाठी आणि त्र्यंबकेश्वरात भक्तीच्या महाकुंभाला सुरुवात झाली आहे . नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे तब्बल एका तपानंतर महाकुंभ मेळ्याला प्रारंभ झाला. या दोन्ही ठिकाणी शंखनादात ध्वजारोहण केल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरूवात झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. कुंभमेळ्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचे घाट साधू, संत आणि भाविकांनी फुलून गेले आहेत. नाशिकमध्ये रामकुंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते, तर त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह, राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते विधीवत पूजन करण्यात आले.

कुंभमेळा म्हणजे? 
कुंभमेळा म्हणजे जगातील सर्वांत वैश्विक उत्सव किंवा मोठी धार्मिक यात्रा. कुंभमेळा हे भारताच्या सांस्कृतिक महत्तेचे दर्शन तसेच सत्संग देणारे आध्यात्मिक संमेलन म्हणूनही ओळखले जाते. गुरूला राशीचक्र भोगण्यास १२ वर्षे लागत असल्यामुळे प्रत्येक १२ वर्षांनी कुंभयोग येतो, असे ग्रंथांमध्ये नमूद आहे. कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक सहभाही होतात. त्यात अनेक विद्वान, संन्यासी, विविध पिठांचे शंकराचार्य, १३ आखाड्यांचे साधू, संत, महात्मा आणि महामंडलेश्वर यांची उपस्थितीत प्रमुख असते. 

आख्यायिका :
समुद्र मंथनाने जो अमृतकुंभ समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला, की जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्य यांना 'सळो की पळो' करून सोडतील. तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृतकुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी १२ दिवस भयंकर युद्ध केले. या युद्धकाळी अमृतकुंभामधून काही थेंब पृथ्वीवर पडले. हे अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व त्र्यंबकेश्वर येथे पडले. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले. सूर्याने अमृतकलशास फुटू दिले नाही व बृहस्पतीने राक्षसांपासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र व गुरु कुंभ राशीत प्रवेश करतात तेव्हा कुंभमेळा भरतो. तसेच गौतम ऋषींनी त्र्यंबकला गोदावरी आणली. त्याचाही संदर्भ कुंभमेळ्याला दिला जातो. 
कुठे भरतात कुंभमेळे :
प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक 
सिंहस्थ पर्वणी :
गुरु कन्या राशीत असतांना 'कन्यागत', सिंह राशीत असतांना 'सिंहस्थ' आणि कुंभ राशीत असतांना 'कुंभमेळा' अशा तीन मोठ्या पर्वणी हिंदु धर्मदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जातात. तेथे गंगास्नान, साधना, दानधर्म, पितृतर्पण, श्राद्धविधी, संतदर्शन, धर्मचर्चा आदी धार्मिक कृती करण्यासाठी कोट्यवधी भाविक येतात. कुंभमेळा हा श्रद्धावानांचा मेळाच असतो.