Whats new

'डीडी किसान' चॅनेलचे ब्रँड अॅम्बेसिडर - अमिताभ बच्चन

amitabh bachachan  

'डीडी किसान' या चॅनेलचे ब्रँड अॅम्बेसिडर स्वीकारण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांना राजी करताना दूरदर्शनने त्यांच्यासोबत तब्बल ६.३१ कोटी रुपयांचा करार केला आहे. आर्थिक संकटातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सुरू केलेल्या 'डीडी किसान' या चॅनेलचे एकूण बजेट ४५ कोटी रुपये असताना केवळ ब्रँड अॅम्बेसिडरसाठी साडेसहा कोटी रुपये मोजण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, अमिताभ यांनी प्रसिद्धीसाठी घेतलेली आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम असल्याचे बोलले जात आहे.

दूरदर्शनच्या 'डीडी किसान' चॅनेलचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे रोजी केले होते. 'डीडी किसान' चॅनेलच्या अॅम्बेसिडरसाठी शोध मोहिमेत सलमान खान, अजय देवगण आणि काजोल यांच्या नावांचाही विचार झाला होता. मात्र, अखेर हा शोध सोन्यापासून ते सिमेंटपर्यंतच्या सर्व उत्पादनांची जाहिराती करणारे आणि गुजरातचे ब्रँड अॅम्बेसिडर अमिताभ बच्चन यांच्या नावावर येऊन थांबला. त्यानंतर लिंटास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या जाहिरात कंपनीमार्फत अमिताभ आणि दूरदर्शन यांच्यात ६.३१ कोटी रुपयांचा करार झाला. यापैकी अमिताभ यांना चार कोटी रुपये देण्यातही आले. या करारानुसार अमिताभ यांना टीव्ही, प्रिंट, इंटरनेट आणि चित्रपटातील जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी ३० एप्रिल २०१६ पर्यंत एक दिवस द्यावा लागणार आहे. मात्र बड्या स्टारला ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून घेतल्यानंतरही 'डीडी किसान' चॅनेलचे केवळ ३६ लाख प्रेक्षक आहेत. प्रसार भारतीने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने अमिताभ बच्चन यांना ब्रँड अॅम्बेसिडर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रसार भारतीचे अतिरिक्त महासंचालक रंजन मुखर्जी यांनी दिली.