Whats new

पंतप्रधानांच्या हस्ते स्मार्ट सिटीसह तीन मोठ्या योजनांचा शुभारंभ

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 लाख कोटी रूपयांची गुंतवणूक असलेल्या स्मार्ट सिटीसह अन्य तीन मोठ्या योजनांचा शुभारंभ केला. यामध्ये देशातील महत्त्वाच्या 100 शहरांची स्मार्ट सिटी योजना, 500 शहरांसाठी शहर सुधारणा आणि पुनर्निमाणासाठी अटल मिशन आणि पंतप्रधान आवास या योजनांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे या तिन्ही योजना तयार करण्यामध्ये पंतप्रधान मोदींनी स्वतः सहभाग घेतला होता. या योजनांवर आगामी पाच वर्षांत चार लाख कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या तीन योजनांना 'विकासाचे तीन इंजिन' असे नाव देण्यात आले आहे. तिन्ही योजना सरकारने वर्षभर सखोल विचार करून लाँच केल्या आहेत. त्यासाठी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि महापालिकांसह नगरपालिकांकडूनही सूचना घेण्यात आल्या.

केंद्र शासित प्रदेश, राज्य, आणि शहरातील विविध तज्ञांची मते जाणून घेत या तीनही योजना तयार करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लोगो तयार करण्यासाठी स्वतः पंतप्रधानांनी विशेष लक्ष घातले होते. केंद्र शासनाच्यावतीने या योजनांसाठी 4 लाख कोटी रूपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

योजनांसाठी मंजूर निधी
स्मार्ट सिटी : 48 हजार कोटी

अमृत सिटी : 50 हजार कोटी

निवास योजना : 03 लाख कोटी


नव्या युगाची नांदी
या योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला 2.3 लाख रुपयांचा फायदा होणार आहे. शहरविकास मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, या तिनही योजना शहरी जीवनाच्या नव्या युगाची नांदी ठरतील. वेगाने विकास होणाऱ्या भारताच्या निर्मितीमध्ये वाढत्या शहरीकरणाचे योग्य नियोजन हे एक महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे. ते म्हणाले की, एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 500 शहरांसाठी एएमआरयूटी योजना लागू करण्यात येईल.


कोणत्या राज्यात किती स्मार्ट सिटीज

उत्तर प्रदेश : 13

मध्य प्रदेश : 7

तामिळनाडू : 12

महाराष्ट्र : 10

गुजरात : 6

कर्नाटक : 6

पश्चिम बंगाल : 4

राजस्थान : 4

बिहार : 3

आंध्र प्रदेश : 3

पंजाब : 3

ओडिशा : 2

हरियाणा : 2

तेलंगणा : 2

छत्तीसगड : 2

जम्मू - काश्मीर : 1

केरळ : 1

झारखंड: 1

आसाम : 1

हिमाचल प्रदेश : 1

गोवा : 1

अरुणाचल प्रदेश : 1

चंदिगड : 1

दिल्ली : 1
काय असेल स्मार्ट सिटीमध्ये
- संपूर्ण नियोजनासह वसलेले शहर
- सायकलसाठी स्वतंत्र लेन
- रस्त्यांवर लोकांना पायी चालता येईल.
- बागा आणि भरपूर हिरवळ
- हायटेक वाहतूक व्यवस्था
- 24 तास वीज आणि पाण्याची सुविधा
- संपूर्ण शहरात वायफाय सुविधा
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
- स्मार्ट पोलिस स्टेशन