Whats new

स्टेफी ग्राफ केरळ आयुर्वेदची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर

 

माजी टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिला केरळच्या आयुर्वेद विज्ञान विभागाने ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी या बाबतची अधिकृत घोषणा केली. केरळची आयुर्वेदिक उपचार पद्धती जगभर मान्यता पावली आहे. केरळच्या आयुर्वेद विभागातून मोठ्या प्रमाणात हेल्थ केअरचे उत्पादन केले जाते. मेडिकल टुरिझममधूनही केरळमध्ये आयुर्वेद उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. अतिशय प्राचीन अशा या उपचार पद्धतीचा अनेकांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. शारीरिक व्याधींपासून मुक्तता, मानसिक संतुलन, विविध असाध्य रोग यावर ही आयुर्वेद उपचार पद्धती प्रभावी ठरली आहे. या उपचार पद्धतीमध्ये विविध प्रकारची तेले, वनस्पतीजन्य औषधे आदींचा वापर केला जातो. विशेषतः मसाज पद्धतीने सांधेदुखीपासून कॅन्सरसारख्या असाध्य रोगांवर या उपचार पद्धतीने सुटका झाली आहे. या आयुर्वेद प्रणालीचा फायदा सर्वांना मिळावा, या उद्देशाने आयुर्वेद विभागाने ‘व्हिजीट केरला स्कीम’ हे अभियान राबविण्याचे ठरविले आहे.

यावेळी विशेषकरून खेळाडूंना अथवा क्रीडा क्षेत्रात कार्यरत राहून निवृत्ती घेतलेल्यांना या उपचार प्रणालीचा लाभ मिळावा हा उद्देश ठेवून हे अभियान राबविण्यात येत आहे. केरळच्या मंत्रिमंडळाने केरळ पर्यटन क्षेत्राला अधिक गती मिळावी म्हणून हे विशेष अभियान राबविण्याचे ठरविले आहे. मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. हे अभियान आखल्यानंतर ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यासाठी टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिच्याशी संपर्क साधण्यात आला. जर्मनीची खेळाडू असलेल्या स्टेफी ग्राफ हिने तब्बल 22 ग्रँडस्लॅम स्पर्धांवर वर्चस्व मिळविले होते. शिवाय तिच्या कारकिर्दीमध्ये आजारीपणा अथवा सांधेदुखीसारख्या आजाराने ती एकदाही स्पर्धेस मुकली नाही. तंदुरुस्तीसाठी तिचा नावलौकिक होता. अशा सर्व कारणांमुळे तिची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून निवड करण्याचे ठरविण्यात आले. 1999 साली तिने खेळातून निवृत्ती स्वीकारली आहे.