Whats new

झहीर अब्बास आयसीसीचे नवे अध्यक्ष, पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्वोच्च पदावर

 

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार झहीर अब्बास यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. बार्बाडोसमध्ये आयसीसीच्या वार्षिक बैठकीत झहीर अब्बास यांची नियुक्ती करण्यात आली.

अब्बास जुलै महिन्यापासून अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतील. पुढील वर्षभर ते या पदावर राहतील.

बांगलादेशचे मुस्तफा कमाल यांनी विश्वचषक स्पर्धेदरम्यानच्या वादानंतर आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होतं.

कमाल यांनी भारत-बांग्लादेश सामन्यानंतर पंचांचे चुकीचे निर्णय आणि भारताला विश्वचषक जिंकून देण्याचा कट आहे. यासारखे वादग्रस्त आरोप करीत वादाला तोंड फोडले होते. आयसीसीच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीने असे आरोप केल्यामुळे, विजेत्या संघाला विश्वचषकाची ट्रॉफी देण्यापासून त्यांना रोखण्यात आलं होतं. त्यावेळी कार्याध्यक्ष असलेल्या एन श्रीनिवासन यांनीच विजेत्या संघाला चषक प्रदान केला होता. या सर्व वादामुळे कमाल यांनी राजीनामा दिला होता.

दरम्यान, झहीर अब्बास यांच्या गळ्यात आयसीसीच्या अध्यक्षपदाची माळ पडली आहे.

1969 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अब्बास यांनी पाकिस्तानकडून 78 कसोटी आणि 62 एकदिवसीय सामने खेळले आहेत. आपल्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात अब्बास यांनी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात 278 धावांची खेळी केली होती.

यानंतर एक फलंदाज म्हणून अब्बास यांची कारकीर्द बहरत गेली. एकदिवसीय सामन्यांमध्येही सलग सामन्यात शतक झळकावणारे अब्बास हे पहिले फलंदाज होते.

एहसान मणी यांच्यानंतर आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे झहीर अब्बास हे दुसरे पाकिस्तानी असतील.