Whats new

महाकाय कृष्णविवर 26 वर्षांनंतर "जागृत'

 

पृथ्वीपासून आठ हजार प्रकाशवर्षे दूर असलेले "व्ही 404 सिग्नी‘ हे महाकाय कृष्णविवर तब्बल 26 वर्षांनंतर जागृतावस्थेत आले असून आजूबाजूच्या ताऱ्यांना शोषून घेण्यासाठी ते सज्ज झाले असल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. महाकाय कृष्णविवराच्या हालचालींचा अभ्यास करण्याची ही नामी संधी असल्याचे त्यांचे मत आहे.

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था "नासा‘ आणि युरोपीय अवकाश संस्थेने अवकाशात एका दुर्मिळ हालचालींची छायाचित्रे टिपली. त्याबाबत अभ्यास केला असता एका अज्ञात स्त्रोतातून क्ष किरणे आणि गामा किरणे बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. अधिक जवळून शोध घेतला असता ही किरणे गेली अनेक वर्षे निद्रिस्त असलेल्या व्ही 404 सिग्नी या कृष्णविवरामधून बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले. शोषून घेण्यासाठी कृष्णविवराच्या आजूबाजूस तारे नसल्यास ते निद्रिस्तस्थितीत जात असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या कृष्णविवराने त्याच्या भोवती फिरणारा तारा गिळंकृत केल्यानेच त्यामधून अचानक क्ष आणि गामा किरणे बाहेर आली.

हे कृष्णविवर जागृत झाल्याने ते ज्ञात अवकाशातील प्रकाशाचा सर्वांत मोठा स्रोत ठरले आहे. याआधी तेजोमेघ (क्रॅब नेब्युला) हा प्रकाशाचा मोठा स्रोत मानला जात होता. हे कृष्णविवर या आधी तीन वेळा निद्रिस्त होऊन जागृत झाल्याची नोंद आहे. 1938, 1956 आणि 1989 मध्ये ते जागृत झाले होते. ही दुर्मिळ संधी साधून अनेक शास्त्रज्ञ त्याचा अभ्यास करण्यात गुंतले आहेत.