Whats new

जागतिक शांतता सूची 2015

 

जागतिक शांतता सूचीमध्ये भूतान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांनी भारताला मागे टाकले आहे, या सूचीत भारत तळाला म्हणजेच 143व्या क्रमांकावर आहे हे विशेष! तर दुसरीकडे आइसलॅंड या छोट्या देशाने या क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला आहे. 

अर्थशास्त्र आणि शांततेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेने ही पाहणी केली आहे. अतिशय कमी लोकसंख्या असलेल्या उत्तर अटलांटिक समुद्रातील आइसलॅंड या देशाने जागतिक शांतता सूचीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. "जागतिक शांतता सूची 2015‘ नुकतीच जाहीर करण्यात आली असून, त्यात 162 देशांचा समावेश आहे. हिंसेचे प्रमाण, संघर्ष आणि सैन्यदलांचा वापर आदी मुद्‌द्‌यांवर प्रत्येक देशाला गुण देण्यात आले आहेत. ज्या देशाला सर्वाधिक गुण मिळाले आहेत, तो देश सर्वांत कमी शांतता असलेला देश असे सूत्र ठरविण्यात आले आहे. त्यानुसार 2.504 गुण मिळाल्यामुळे भारत 143व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. भारतात अंतर्गत संघर्षात बळी गेलेल्यांची संख्या वाढली असून, नक्षलवादाच्या वाढत्या प्रभावामुळे देशातील शांततेला गालबोट लागते आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या यादीतील पहिल्या दहा देशांमध्ये युरोपातील सहा देश असून, डेन्मार्क दुसऱ्या, तर ऑस्ट्रिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान 154व्या क्रमांकावर असून, अफगाणिस्तान 160व्या क्रमांकावर आहे.