Whats new

१ जुलैपासून 'सेवा हमी'चा अंमल

 

सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जगण्यातील शासनाशी संबंधित लहानसहान कामे तत्परतेने व्हावीत आणि भ्रष्टाचाराच्या वाटा बंद व्हाव्यात यासाठी जारी करण्यात आलेला लोकसेवा हक्क कायदा राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये १ जुलैपासून अमलात येणार आहे. तसा आदेश शासनाने जारी केला आहे. नागरिकांना आता जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी, मालमत्ता करआकारणी इत्यादी दाखले तीन दिवसांत मिळतील. नळजोडणी १५ दिवसांत मिळेल, तर भोगवटा प्रमाणपत्राला एक महिन्यांपेक्षा आणि बांधकाम परवान्यासाठी दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार नाही.

सर्व महानगरपालिका व नगरपालिकांध्ये लोकसेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी टास्क फोर्सचीही स्थापना करण्यात आली आहे. लोकसेवा हमी अध्यादेशाखाली महापालिकांच्या १५ व नगरपालिकांच्या १३ सेवा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यासंबंधी महानगरपालिका व नगरपालिकांनी स्वतंत्र अधिसूचना काढून त्या सेवा नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करायच्या आहेत. शाळेत मुलाची नावनोंदणी करायची असो अथवा अन्य कोणत्याही कारणासाठी असो, साधा जन्माचा दाखला मिळवायचा म्हटले तरी, नागरिकांना महिनोमहिने पालिका कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मृत्यूचा दाखला, मालमत्ता कर भरल्याचे प्रमाणपत्र, भाग नकाशा, विवाह नोंदणी, याबाबतचे दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे घालावे लागतात. त्यातूनच मग चिरीमिरी व पुढे भ्रष्टाचाराच्या पायवाटा आणि राजमार्ग बनतात. त्याला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने विहित कालावधीत नागरिकांची कामे होण्यासाठी लोकसेवा हमी कायदा करण्याचा निर्णय घेतला. २८ एप्रिल २०१५ ला तसा अध्यादेश काढण्यात आला.